महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा पााभूत सुविधा प्रकल्प म्हणून समृद्धी महामार्ग या प्रकल्पाकडे बघितले जात आहे. मुंबई आणि नागपूर ही दोन शहरे थेट जोडणारा, मराठवाडा – विदर्भाला एक वेगवान पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणारा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाकडे बघितलं जात आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ कि.मी. लांबीच्या समृद्धी महामार्गवर ताशी १५० किमी वेगाने वाहने धावणार आहेत.
हा मार्ग सुरु करण्याबाबत आत्तापर्यंत काही तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र करोना काळ, टाळेबंदी यामुळे या महामार्गाचे काम काहीसे लांबणीवर पडले. असं असतांना मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलू बाजार, वाशिम असा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन २ मेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र नापूर जवळ पहिल्या टप्प्यात वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या एका उन्नत मार्गाला कामादरम्यान तडे गेल्याचं लक्षात आल्यानं जवळपास दोन महीने या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे.
असं असतांना या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पुढच्या भागात बुलडाणा जिल्हात एक दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा इथे दोन डोंगराळ भागाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. या ठिकाणी काम करणारे कामगार हे जेवायला गेले असल्यामुळे ते थो़डक्यात बचावले, जीवीतहानी झाली नाही. असं असलं तरी पूलाचा भाग एका ट्रेलरवर कोसळल्याने ट्रेलरचे नुकसान झाले आहे. संबंधित भागाचे काम हे किती दिवस लांबणीवर पडले आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. तेव्हा समृद्धी महामार्गवर विविध ठिकाणी कामे युद्धपातळीवर सुरु असतांना सिंदखेडराजा इथल्या अपघाताच्या निमित्ताने समृद्धी महामार्गासाठी अडथळ्यांची शर्यत सुरु असल्याचं दिसून येत आहे.