Parth Pawar Slams Amol Mitkari over Statement on Naresh Arora : अजित पवार यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. या यशानंतर अनेकांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं. दरम्यान, अजित पवारांचे माध्यम सल्लागार व अजित पवारांच्या प्रचाराचं काम करणाऱ्या डिझाइन्डबॉक्स या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नरेश अरोरा यांनी देखील अजित पवारांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यावेळी अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. हा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांवर संताप व्यक्त केला होता. “अरोराची अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवायची हिंमत कशी झाली?” अशा शब्दांत मिटकरींनी जाब विचारला. तसेच मिटकरी म्हणाले की “या अरोराने अजित पवारांच्या जुन्या सोशल मीडिया टीममधील मुलांना काढून स्वतःच्या लोकांची भरती केली. त्याने अनेकांचा अपमान केला. मी याबाबत पार्थ पवार व जय पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे”. मात्र, मिटकरींनी तक्रार करण्यापूर्वीच पार्थ पवारांनी थेट मिटकरींना समज दिली आहे.
नरेश अरोराने अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून काढलेला फोटो समाजमाध्यमांवर पाहून मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की “विधानसभा निवडणुकीतील विजय हे अजित पवारांच्या मेहनतीचं फळ आहे. गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती. दादांच्या खांद्यावर हात पाहून मनाला वेदना झाल्या. माझ्यासारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या दादांचा सैनिक हे माफ करणार नाही”. मात्र काही वेळाने मिटकरी यांनी ही पोस्ट एक्सवरून डिलीट केली.
पक्षाने मिटकरींना एकटं पाडलं, मिटकरींकडूनही चोख प्रत्युत्तर
पक्षाने अशा प्रकारे अमोल मिटकरींना एकटं पाडल्यानंतर मिटकरी यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट करून पक्षालाच सुनावलं. मिटकरी यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं, “हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का? मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे.आमचा साधा प्रश्न आहे,अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली? हा महाराष्ट्र आहे, चंदिगड नाही. याचूक कबूल करा. सॅलरी सोल्जर”.
नरेश अरोरांवर टीका केल्यामुळे पार्थ पवारांकडून अमोल मिटकरींना समज
या सगळ्या घडामोडींनंतर आता अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी अमोल मिटकरींना समज दिली आहे. पार्थ पवारांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की अमोल मिटकरी यांनी पक्षाचे विधानपरिषदेचे सदस्य असूनही, DesignBoxed आणि नरेश अरोरा यांच्या संदर्भात पक्षविरोधी भूमिका घेतली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. माझा पक्ष आणि माझे वडील, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे मिटकरी यांच्या वक्तव्यांशी कोणत्याही प्रकारे सहमत नाहीत. त्यांना अशा टिप्पण्या किंवा माध्यमांमध्ये वक्तव्ये करण्यापासून दूर राहण्याचं आवाहन करतो.