निवडणुकीच्‍या काळात आमच्‍या पक्षातील काही लोकांना आयत्या वेळी अवदसा आठवली आहे. आघाडी झाली की गोष्टी मान्य केल्या पाहिजेत. एका घरात भांड्याला भांड लागतं. देशाचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असते पण दीपक केसरकरांची ही गोष्ट मान्य नाही, असे शरद पवार म्हणाले. पक्षाच्या जिल्हाच्या अध्यक्षांनीही योग्य भूमिका घेतली नाही, असे खडेबोल सुनावत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंच्या प्रचारात सहभागी व्हावे असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गातील सभेत दिले आहे.
सिंधुदुर्गात काँग्रेसचे उमेदवार निलेश राणेंचा कोणत्‍याही परिस्थितीत प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका राष्‍ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी घेतली आहे. दीपक केसरकर यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीमध्‍ये तणाव निर्माण झाला होता. मात्र, राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिंधुदुर्गमध्‍ये संयुक्त प्रचार सभा घेऊन कोकणात आघाडीत निर्माण झालेले बिघाडीचे वातावरण शांत करण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रचार सभेत शरद पवारांनी दीपक केसरकर यांना खडेबोल सुनावतच राष्ट्रवादीचे स्थानिक जिल्हाध्यक्ष बाळा भिसे हे परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे त्यांची या पदावरुन हकालपट्टी केल्याची घोषणाही त्यांनी केली. शरद पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या दीपक केसकर यांना पक्षांतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने घेतलेल्‍या निर्णयाविरुध्‍द भूमिका घेतल्‍याने त्‍यांना नोटीस देण्‍यात आल्‍याचे सांगण्‍यात येते.

Story img Loader