‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंट रीसर्च फाऊंडेशन’ (ए. इ. आर. एफ.) आणि ‘पश्चिम घाट बचाव गट’ यांच्यातर्फे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान महाबळेश्वर येथे पश्चिम घाट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम घाटाला ‘युनेस्को’कडून मिळालेला जागतिक वारशाचा दर्जा आणि काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झालेला पश्चिम घाट तज्ज्ञ समितीचा अहवाल या पाश्र्वभूमीवर परिषद होत आहे. सह्य़ाद्रीसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांचा अनुभवी कार्यकर्त्यांशी परिचय वाढावा आणि चर्चेतून पश्चिम घाटाच्या पर्यावरणाविषयीच्या निर्णय प्रक्रियेस चालना मिळावी हा या परिषदेचा उद्देश आहे. सह्य़ाद्रीत काम करणारे संशोधक, कार्यकर्ते, आंदोलक, अधिकारी, गिर्यारोहक, पत्रकार व उद्योग क्षेत्रातील लोक परिषदेत सहभागी होणार आहेत. १९८७-८८ मध्ये झालेल्या पश्चिम घाट बचाव मोहिमेला या वर्षी पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. पंचवीस वर्षांत सह्य़ाद्रीत काय घडले व काय बिघडले याचा आढावा परिषदेत घेतला जाणार आहे. राजस्थानमधील जल व्यवस्थापनाबाबत दीर्घकाळ काम करणारे अनुपम मिश्र यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. पश्चिम घाट तज्ज्ञ समितीच्या अहवालाबाबत परिषदेत होणाऱ्या सत्रात समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ सहभागी होणार आहेत. पश्चिम घाटाला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेले डॉ. व्ही. बी. माथूर परिषदेतील प्रमुख वक्ते आहेत. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम घाटातील आदिवासींच्या कला- संस्कृतीवरील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पश्चिम घाटाचे प्रतिबिंब प्रसारमाध्यमे आणि लिखित साहित्यात कसे उमटते; पश्चिम घाट आणि शहरी भाग यांतील दुवा काय, याबद्दल दुसऱ्या दिवशी सत्रे होणार आहेत. परिषदेच्या तिसऱ्या दिवशी पर्यावरणवादी अर्थव्यवस्था आणि तिचा राजकारणाशी असणारा संबंध यावर चर्चा करण्यात येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा