नांदेड : केंद्र सरकारने सुरु केलेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पोस्टात मुलींचे खाते काढून देण्याचा आपण सुरु केलेला उपक्रम कधीही बंद पडू देणार नाही, या योजनेच्या माध्यमातून माझे वडील स्व.बालाजीराव पाटील रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यस्मरणार्थ सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा माझा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केले. रातोळी ता.नायगाव येथे सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 1 हजार मुलींना पोस्टाचे पासबूक वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. रातोळी येथील पोलीस पाटील कै.बालाजीराव मारोतराव पाटील रातोळीकर (पोलीस पाटील) यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी विषयक मार्गदर्शन व सुकन्या समृद्धी योजनेतील 1 हजार लाभार्थी मुलींना मान्यवरांच्या हस्ते पासबुक वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना रातोळीकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुकन्या समृद्धी योजना सुरु केल्यापासून आपण जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी हा उपक्रम सुरु केला आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सातत्याने लाभार्थी मुलींचे पोस्ट खात्यामार्फत खाते काढून त्यांना पासबूक वाटप केले जात आहे. माझे वडील पोस्ट खात्यात सेवेत होते त्यामुळे या खात्याविषयी कौटुंबिक जिव्हाळा म्हणून ही योजना आपण हाती घेतली आहे, या मागे कुठलेही राजकारण, स्वार्थ असण्याचे कारण नाही. जीवनात कुठल्याही ऋणातून आपल्याला मुक्त होता येते परंतु जन्मदात्या आई-वडिलांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, याची जाणीव ठेवून अशा प्रकारच्या विविध सामाजिक उपक्रमातून आपण माता-पित्यांचे स्मरण केले पाहिजे, असे भावनिक उद्गारही रातोळीकर यांनी आपल्या भाषणात काढले.
मुलींना अथवा त्यांच्या पालकांनाही वयाच्या 18 वर्षांपर्यंत ही रक्कम काढता येत नाही, विशेष म्हणजे या योजनेचा 12 वा अतरिक्त हप्ताही मी स्वतः जमा करणार असल्याची घोषणाही रातोळीकर यांनी केली. या योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्हा हा पहिला क्रमांकावर असला तरी आपला नांदेड जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे .हा जिल्हा पहिला क्रमांक आणण्यासाठी स्थानिक सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व सर्वांना विश्वासात घेऊन आपण प्रयत्न करू असे आश्वासनही रातोळीकर यांनी दिले. डाक अधीक्षक सतीश पाठक यांनीही यावेळी आपल्या मनोगतात सुकन्या समृद्धी योजनेत नांदेड जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी आपण प्रयत्न करू त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमास डाक अधीक्षक नांदेड सतीश पाठक, सहाय्यक डाक अधीक्षक अरुण गायकवाड, कृषी तज्ञ नागेश यमेकर, धनराज शिरोळे , ऍड. ज्ञानेश्वर मोरे, भाजपा नेते जी. व्ही. स्वामी, अरुण सुकळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे
गेल्या तीन-चार वर्षांपासून राम पाटील रातोळीकर यांनी सुरु केलेला हा उपक्रम म्हणजे महिला-मुलींचा गौरव असल्याचेच द्योतक आहे. ही योजना राबविताना जातीपातीचा विचार न करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून गरीब कुटुंबातील मुलींची आर्थिक समृद्धी व्हावी, तिच्या लग्नासाठी पालकांना आर्थिक मदत व्हावी हा योजनेचा उद्देश असून ही त्यांची स्वच्छ भूमिका आहे. रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते जोपासण्याचा रातोळीकरांनी केलेला हा संकल्प म्हणजे सर्वांसाठीच आदर्शदायी असल्याचे मत यावेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.