पालघर-विरार लोकलच्या वेळेचे नियोजन करण्याची प्रवाशांची पश्चिम रेल्वेकडे मागणी
पालघर : मुंबईकडे जाणाऱ्या उपनगरी गाडय़ांमध्ये वैतरणा ते विरार या रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या अतिरिक्त वेळेचे नियोजन केल्यास डहाणू व पालघर तालुक्यातील रेल्वे प्रवासी मुंबईत १० मिनिटे अगोदर पोहोचू शकले. त्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांदरम्यान असलेला टेक्निकल रेस्ट अर्थात अतिरिक्त वेळेची तरतूद डहाणू रोड या उपनगरी क्षेत्रातील अखेरच्या रेल्वे स्थानकात करण्याची मागणी पश्चिम रेल्वेच्या विभागीय प्रवासी समितीच्या प्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
पश्चिम रेल्वेच्या झोनल रेल्वे युसर्स कन्सल्टेशन कमिटीची बैठक अलीकडेच पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक ए. के. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पालघर भागाचे प्रतिनिधित्व करणारे सदानंद (नंदू) पावगी व तेजराज हजारी यांनी या भागातील प्रवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या या बैठकीत मांडल्या.
विरारहून पालघरला येणाऱ्या उपनगरीय गाडय़ांना सरासरी ३२ ते ३५ मिनिटांचा कालावधी लागत असताना पालघरकडून विरारकडे जाणाऱ्या गाडय़ा या ४५ ते ५० मिनिटांचा अवधी घेत असल्याची माहिती प्रवासी प्रतिनिधी यांनी या बैठकीत निदर्शनास आणली. वैतरणा ते विरार या दोन रेल्वे स्थानकांमध्ये असलेले अंतर कापण्यासाठी अतिरिक्त वेळेचा (टेक्निकल रेस्ट) अवधी देण्यात आला असून ही अतिरिक्त वेळ डहाणू रेल्वे स्थानकाच्या अलीकडे देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. असे झाल्यास पालघर व डहाणू तालुक्यातील उपनगरीय प्रवासी हे मुंबईला १० मिनिटं लवकर पोहचू शकतील याकडे या सदस्यांनी लक्ष वेधले.
‘महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेसला थांबा द्यावा!’
काही महिन्यांपासून महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस ही सुपरफास्ट गाडी सुरू करण्यात आली असून, या गाडीला राज्यातील एकाही स्थानकांमध्ये थांबा नाही. या गाडीचा पहिला थांबा हा गुजरात राज्यात आहे. अशा परिस्थितीत या गाडीतून प्रवास केल्यास राज्यातील प्रवाशांचा लाभ कसा होणार, असा सवाल व्यक्त करून या गाडीला पालघर किंवा डहाणू येथे थांबा देण्याची मागणी रेल्वे प्रवासी समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे.
प्रवासी संघटनांच्या अन्य मागण्या
* डहाणू व विरार या उपनगरी रेल्वे स्थानकांसमोर कोणत्याही गाडय़ांना साइडला काढण्यात येऊ नये.
* पालघर रेल्वे स्थानकाबाहेर परवानगी असलेल्या संख्येइतकीच एसटी बस व रिक्षा थांबवण्यात याव्यात, तसेच इतर वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ निर्माण करण्यात यावा.
* दोन ट्रॅकमध्ये फेन्सिंग जाळ्या टाकण्यात याव्या.
* पालघर-बोईसर रेल्वे स्थानकात तातडीने सरकते जिने कार्यान्वित करण्यात यावे.
* पालघर हे जिल्हा मुख्यालयाचे स्थान झाल्याने या रेल्वे स्थानकांचा दर्जा उंचवावा.
* वांद्रे-उदयपूर व इंदोर-पुणे या गाडय़ांना पालघर येथे नव्याने थांबा मिळावा.