एस. टी. महामंडळातील तब्बल पावणेसात हजार कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मोर्चासाठी सामूहिक रजा घेतल्याने महामंडळाचे बसच्या फेऱ्यांचे संपूर्ण राज्याचे नियोजन कोलमडले आहे. त्याचा सर्वसामान्य प्रवाशांना चांगला फटका बसला आहे. ठिकठिकाणी प्रवाशांना मोठय़ा प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागले. यावर उतारा म्हणून शहर बस वाहतुकीच्या फेऱ्या बंद करून या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्याचे महामंडळाने ठरविले आहे.
एस. टी. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी मनसे परिवहन विभागातर्फे उद्या (शुक्रवारी) मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून गुरुवारी सकाळपर्यंत पावणेसात हजार कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकली आहे. यात आणखी बऱ्याच कर्मचाऱ्यांची भर पडण्याची शक्यता वर्तविली जाते. परंतु त्यामुळे राज्यातील बसच्या ३० टक्क्य़ांहून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. मकरसंक्रात व वेळा अमावस्येच्या पाश्र्वभूमीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे परिवहन विभाग चांगलाच कात्रीत सापडला आहे.
महामंडळाचे राज्यभरात एकूण १ लाख २५ हजार कर्मचारी आहेत. देशातील बंगलोर व महाराष्ट्र ही दोन परिवहन महामंडळ फायद्यात आहेत. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना महामंडळ फायद्यात असतानाही अनेक लाभांपासून सरकारने दूर ठेवले असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. यातील वेतनकरार हा सर्वात महत्वाचा मुद्दा घेऊन मागील अनेक दिवसांपासून महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अनेक संघटना आक्रमक भूमिका घेत आहेत. याच मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवहन विभागाच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात मनसे व्यतिरिक्त अन्य संघटनेच्या कर्मचाऱ्यांनीही मोठय़ा प्रमाणात या मोर्चासाठी सामूहिक रजा टाकली आहे. मोर्चात सहभागासाठी एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी एकाच वेळी रजेवर गेल्यामुळे महामंडळाची सेवा कोलमडून खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे मात्र या दोन दिवसांत चांगलेच फावणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्य़ात कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी आहे. त्यात ७००पेक्षा अधिक कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच रजा टाकली वा सुटीवर गेले आहेत, त्यांची रजा रद्द करण्यात आली आहे. दिवसभरात जिल्ह्य़ातील २५४पैकी ३५ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. अन्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. शक्यतो लांब पल्ल्याच्या फेऱ्या रद्द होणार नाहीत, याची काळजी घेतली जात असल्याचे उस्मानाबादचे विभागीय नियंत्रक प्रदीप खोबरे यांनी सांगितले.
दरम्यान, मोर्चासाठी कर्मचारी जात असले तरी एकही फेरी रद्द होणार नाही. याची दक्षता घेण्यात आली असल्याचे उस्मानाबाद आगार नियंत्रक गीते यांनी सांगितले. उस्मानाबाद आगारात गुरुवारी सकाळपर्यंत १२४ कर्मचाऱ्यांनी रजा टाकली आहे.
मोर्चाला पोलीस खात्याची परवानगीच नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेना परिवहन विभागाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या मोर्चास पोलीस खात्याकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे मोर्चात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबईच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी पत्राद्वारे एस. टी. महामंडळाच्या राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

Story img Loader