वांग प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य पुनर्वसनासाठी दिवाळीनंतर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. पुनर्वसनात अडसर ठरणारे राज्याचे पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम व गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य करून ते त्यांच्या मतदारसंघात कसे फिरतात ते पाहू, त्यांना भंडावून सोडल्याखेरीज गप्प बसणार नसल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कराड विमानतळ विस्तारवाढ बाधितांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सहकार्य करणार नसतील, तर ते कराड दक्षिणमधून रिंगणात उतरल्यास आमचाही त्यांना असहकारच राहील असाही इशारा पाटणकर यांनी दिला. वांग धरणग्रस्तांच्या पुनर्वसनातील प्रमुख अडसर पुढे आणल्याशिवाय आणि त्याच्यासाठी संघर्ष केल्याखेरीज न्याय मिळणे केवळ अशक्य आहे. सद्य:स्थितीत हा संघर्ष महाराष्ट्राचे पुनर्वसनमंत्री, त्यांचे मंत्रालय आणि प्रशासनाच्या विरोधातच द्यावा लागत आहे. जमीन उपलब्ध असूनही पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी या जमीन वाटपावर स्थगिती आणली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश देऊनही गायराने वर्ग केली जात नाहीत. जमीन वाटपासाठी पुरेशी यंत्रणा उभी करण्याचे शासनाने धोरण स्वीकारले नाही, पुनर्वसन अधिकारी हे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे पद सांगलीला रिक्त असणे हाही एक प्रमुख अडथळा आहे. हे अडथळे दूर करण्यासाठीच संघर्ष तीव्र करणे प्रकल्पग्रस्तांचे आता लक्ष्य असेल. ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ असा शासन निर्णय असताना, त्याची अंमलबजावणी होत नाही. मंत्रालयाचे संबंधित अधिकाऱ्यांचेही अडथळे असून, ते दूर केल्याखेरीज प्रकल्पग्रस्तांना न्याय नाही, आणि त्यासाठी दिवाळीनंतर शासनाची नस पकडण्याच्या ठिकाणी आंदोलन करताना, पाणी हवे पण मतदारसंघात पुनर्वसन नको असलेले आर. आर. पाटील व त्यांना पाठीशी घालीत पुनर्वसनासाठी असहकार्य करणारे पुनर्वसनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना त्यांच्या मतदारसंघात फिरू न देता चांगलेच भंडावून सोडणार असल्याचा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

Story img Loader