सांगलीतील लोक दूषित पाणी पिऊन जगतातच कसे, असा प्रश्न आपणास पडला असल्याचे सांगत महापालिकेचा कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जाण्यास सज्ज राहा, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.
लवकरच आपण काँग्रेस नगरसेवकांची बठक घेणार असून त्यानंतर कारभार सुधारला नाही तर आपण महापालिकेत लक्ष घालणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसला सत्ता मिळावी यासाठी आपणाकडे मदन व प्रतीक पाटील आले होते. मात्र सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या कारभारात आपण लक्ष घातले नाही. पदे कोणाला दिली, कशी दिली याबाबत सर्वाधिकार मदन पाटील यांना दिले, असे असताना महापालिकेचा कारभार लोकाभिमुख होत असल्याचे दिसत नाही.
महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळावी यासाठी मिरजेत काही तडजोडी केल्या. इद्रिस नायकवडी यांना काँग्रेसच्या उमेदवारीवर लढण्यास सांगितले. स्थायी सभापती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर काँग्रेस अडचणीत येऊ शकते. त्यामुळे त्यांना सबुरीने घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे स्थायी निवडीत कोणतीही अडचण येणार नाही.
शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही. शहरातील लोक दूषित पाणी पिऊन जगतात कसे असा प्रश्न पडला आहे. मिरजेत गॅस्ट्रोची साथ आली. काही बळी गेले. मात्र महापालिकेचा कारभार काही सुधारण्याची लक्षणे दिसत नाहीत. सांगलीच्या शेरीनाल्याचा प्रश्न अद्याप जैसे थे आहे. मंजूर निधी एकाच प्रभागात खर्च होण्याऐवजी समान वाटप व्हायला हवे.
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना विधानसभा निवडणुकीत मदन पाटील यांचा पराभव का झाला याचे विश्लेषण करावे लागणार आहे. या पराभवामागे महापालिकेतील गरकारभार असू शकतो. यापुढे काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून अन्य पक्षातील काही मंडळी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आता कोणाच्या दारात पक्ष बांधणीसाठी आपण जाणार नाही, असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जा
सांगलीतील लोक दूषित पाणी पिऊन जगतातच कसे, असा प्रश्न आपणास पडला असल्याचे सांगत महापालिकेचा कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जाण्यास सज्ज राहा, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.

First published on: 05-12-2014 at 03:50 IST
TOPICSपतंगराव कदम
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Patangrao kadam criticized sangli mnc