लोकसभा निवडणुकीला दीड वर्षांचा अवधी असला तरी सांगलीत मात्र, याची तयारी आतापासूनच सुरू आहे. भाजप आणि काँग्रेस अशी लढत अपेक्षित असली तरी या वेळी काँग्रेसची भाकरी पलटली जाण्याच्या शक्यतेने कदम गटाची मोच्रेबांधणी सुरू असून या दिशेने डॉ. पतंगराव कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाढविलेली जवळीक याचे संकेत देत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी ही माझी शेवटीचीच निवडणूक म्हणत डॉ. कदम यांनी मतदारांना भावनिक आवाहन करीत भाजपवर मात केली. मात्र बदलत्या स्थितीत पुन्हा मांडवात येण्याची घाई त्यांना झाल्याचे वाढदिवसाला जाहिरातीवर करण्यात आलेली लाखो रुपयांची उधळण दर्शविते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगलीत लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून सहा महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक ही भाजप-काँग्रेसची चाचणी परीक्षा ठरणार आहे. काँग्रेस या वेळी भाकरी बदलण्याच्या तयारीत असल्याची वदंता असल्याने ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांनी  मोच्रेबांधणी सुरू असून वसंतदादा घराण्याबाहेर उमेदवारी जाण्याचे संकेत मिळू लागल्यानेच वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी विधानसभेची तयारीही सुरू केली आहे.

डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांना सांगली मतदारसंघाचे वेध लागले आहेत. गेल्या वेळी पुणे लोकसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले. यंदा सांगलीतून त्यांना रिंगणात उतरविण्याची तयारी डॉ. कदम यांनी केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना मिळालेली खासदारकी हा जसा मोदी लाटेचा परिणाम होता, तसाच माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्या निष्क्रियतेचाही परिपाक होता. केवळ घराणेशाही म्हणून सत्तापदे ताब्यात घ्यायची आणि केवळ स्वत:च पदे उपभोगायची ही प्रथा सर्वच राजकीय घराण्याप्रमाणे दादा घराण्यातही कायम राहिली. दादांचे कर्तृत्व आणि सामान्य माणसाला दिला जाणारा आपलेपणा याचा वारसा मात्र, दादांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात जोपासला गेल्याचे फारसे जाणवलेच नाही. याचा परिणाम म्हणून काँग्रेसने यंदा भाकरी पलटण्याचा निर्णय घेतला तर नवल वाटायला नको.

गेल्या पाच वर्षांत सांगलीत राजकीय संदर्भ बदलले आहेत. मोदी सरकारविरुद्ध समाजात असंतोषाची सुप्त लाट असल्याचे भासत असून याची लाटही निर्माण होऊ शकते याचा राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न कदम गटाकडून सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला दादा घराण्यात खासदारकीपेक्षा आमदारकीसाठीच पसंती देण्याचे घाटत आहे.

विधान परिषद निवडणुकीवेळी मोहनराव कदम यांना भाजपमधून रसद पुरवठा करण्याची करण्याची भूमिका खासदार पाटील यांनी घेतली होती हे आता लपून राहिलेले नाही. कदम गटाशी जुळवून घेत असताना तासगाव कारखान्याचा वादही सध्या बासनात असल्याने फारशी अडचण आली नसली तरी खानापूरच्या यशवंत कारखान्याचा वाद आजही धुमसत आहे. तसेच सदाशिवराव पाटील यांना मदत करण्याची खासदारांची भूमिका आणि वालचंद महाविद्यालयाचा ताबा यावरून भाजपमध्ये खासदार विरुद्ध जिल्हाध्यक्ष देशमुख हा वादही सुप्तावस्थेत आहेच. याला तासगाव नगरपालिका निवडणुकीत देशमुख यांनी राष्ट्रवादीला सहकार्य केल्याचा आक्षेप खासदारांचा आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या निवडीला खासदारांनी विरोध करीत शिवाजी डोंगरे यांची उमेदवारी दाखल करण्याचा केलेला प्रयत्न ही भाजपमध्ये शिस्त कशा प्रकारची आहे हे दर्शविण्यास पुरेसा आहे. मात्र हाच वाद आजही कायम असल्याने भाजपला गेल्या निवडणुकीत मिळालेले अडीच लाखाचे मताधिक्य कायम राहील याची हमी भाजपाचे नेतेही देणार नाहीत अशी स्थिती आहे. नेमक्या याच स्थितीचा अंदाज घेत डॉ. कदम यांनी लोकसभेची मोच्रेबांधणी सुरू केली असल्याचे चित्र आहे. याचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रसिद्धी करण्यात आली.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कदम यांनी जुळवून घेतले असून विधान परिषदेवेळी झालेले डावपेच झाले गेले असे सांगत दोन्ही काँग्रेसच्या आघाडीसाठी साकडे घातल्याचे मानले जात आहे.

सांगलीत दादा घराण्यात असलेली भाऊबंदकी लाभदायी कशी होईल याचेही गणित घालण्यात आले असून मदन पाटील यांच्या मुलींशी करण्यात आलेली सोयरीकही कदम गटाच्या पथ्यावर पडणार आहे. आमदारकीला दादा घराण्यातील थोरल्या पातीला बाजूला सारून धाकटी पाती पुढे रेटण्याचे प्रयत्न होणार हे स्पष्ट दिसत असल्यानेच विशाल पाटील यांचीही अधूनमधून कदम गटावर टीका सुरू असते.