जिल्हा परिषदेवर वर्चस्व निर्माण करण्याकरिता काँग्रेसचे डॉ. पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे जयंत पाटील या दोन माजी मंत्र्यांमध्ये जुंपली असून, वर्चस्वाच्या या वादात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र अशा आघाडय़ा जिल्हाभर होत असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने एकमेकांच्या ताकदीवर घाला घालण्यासाठी कुठे स्वाभिमानी, कुठे भाजपा, तर कुठे जनसुराज्यची मदत घेतली आहे.
जिल्हा परिषदेची गेली १५ वष्रे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला प्रथमच आव्हान आहे. विधान परिषद आणि नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला लागलेली अधोगती रोखण्याचे प्रयत्नही पक्षीय पातळीवर फारसे होताना दिसत नाहीत. पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी जरी दिसत असली तरी पक्षाची प्रथमपासूनच आघाडीची तयारी जाहीरपणे वर्तविण्यात येत होती. मात्र विधान परिषद निवडणुकीवेळी झालेला त्रास लक्षात घेऊन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादी संपली असल्याचे सांगत आघाडीचा हात झिडकारला. एक हजाराचा आमदारकीचा शर्ट पाच हजार रुपयाला पडला असल्याचे सांगत आ. पाटील यांनी आघाडीसाठी काटेच पेरण्याचे काम केले. मात्र दुसऱ्या बाजूला जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांची कदमांशी असलेली मत्री वापरून आघाडीचा हात हाती घेण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले.
मात्र आता अंतिम टप्प्यात समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे मनसुबे बाजूला ठेवत दोन्ही काँग्रेसनी जिल्हा परिषदेच्या जास्तीत जास्त जागा कशा पदरात पडतील याची गणिते घालण्यास प्रारंभ केला आहे. एकीकडे भाजपा विरोधक अशी प्रतिमा उभी करण्यात राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील प्रयत्न करीत असताना आज भाजपायी असणारी नेते मंडळी कोणाच्या गोटात होती हे जाहीर आहे. शिराळ्याचे शिवाजीराव नाईक वगळता अन्य तीन भाजपा आमदारांमागे उभी असलेली ताकद अगदी खासदारकीच्या निवडणुकीवेळीसुद्धा बऱ्यापैकी राष्ट्रवादीचीच होती.
तीन तालुक्यांवर मदार
काँग्रेसकडे डॉ. कदम आणि राष्ट्रवादीकडे आमदार जयंत पाटील हेच जिल्हा पातळीवर नेतृत्व आहे. या वेळी राष्ट्रवादीला आर. आर. आबांची पोकळी प्रथमच प्रकर्षांने जाणवणार आहे. जिल्हा परिषदेच्या मिरज आणि वाळवा या तालुक्यांत प्रत्येकी ११ आणि जत तालुक्यात १० अशा निम्म्या जागा आहेत. या तीन तालुक्यांतील राजकीय तडजोडी कुणाच्या कशा होतात यावर जिल्हा परिषदेवर झेंडा कोणत्या रंगाचा हे स्पष्ट होणार आहे. मिरज तालुक्यात काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपाचे नेते अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीशी राष्ट्रवादीने तडजोड केली असून जतमध्ये वसंतदादा विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांच्यामार्फत बोलणी करण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला तासगावमध्ये डॉ. कदम यांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येणार नाहीत या बोलीवर भाजपाची मदत खासदार संजयकाका पाटील यांच्याकडून विधान परिषदेसाठी घेण्यात आल्याची वदंता आहे.