हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत सहभागी असणाऱ्या पाटणकर घराण्याचा इतिहास अविस्मरणीय, अलौकिक व न विसरणारा असल्याचे सांगताना मात्र, स्वराज्यासाठी झटणाऱ्या घराण्यांचा इतिहासच उपलब्ध नसल्याची खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
पाटणच्या श्रीराम देवस्थान ट्रस्टतर्फे क्षत्रिय कुलावंतस चालुक्य-साळुंखे ऊर्फ श्रीमंत सरदार पाटणकर घराण्याचा इतिहास या कुलवृत्तान्तपर ग्रंथाचे प्रकाशन पाटण येथे पुरंदरे यांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, सातारचे शिवाजीराजे भोसले, आमदार विक्रमसिंह पाटणकर, प्रतापसिंह पाटणकर, विक्रमबाबा पाटणकर, विजयसिंह पाटणकर, जयसिंगराव पाटणकर, रावसाहेब पाटणकर यांची उपस्थिती होती.
बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, की महाराष्ट्रात अनेक घराणी होऊन गेली. त्यांचे स्वराज्यासाठी मोठे बलिदान आहे. त्या घराण्यांपैकी ३५ घराण्यांनी इतिहास पुस्तकांच्या माध्यमातून मांडला आहे. मात्र, काही घराण्यांचा इतिहासच उपलब्ध नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पाटणकर घराण्याला थोर परंपरा आहे. या घराण्यातील पूर्वीचा इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचे केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून पाटणकर घराण्याचा इतिहास पुढे आला आहे. पाटणकर घराण्याचा इतिहास मांडताना आढळून आलेली शिवकालीन पत्रे ही प्रत्येक शाळेत, ग्रंथालयामध्ये असावीत इतकी मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले.
राजघराण्यांचा इतिहास ऐकण्यासाठी त्या घराण्यातील युवापिढीची उपस्थिती गरजेची असते. पाटणकर घराण्याचा इतिहास पुस्तकरूपाने आपल्यासमोर येत आहे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. प्रत्येक पिढीने या इतिहासाचे अवलोकन केले पाहिजे. शिवछत्रपतींच्या लढय़ात पाटणकर घराण्याने जबरदस्त पराक्रम गाजविला. मोगलांबरोबर झालेल्या लढय़ात पाटणकर घराणे अग्रेसर होते. प्रत्येकाने अभिमान बाळगावा असाच पाटणकर घराण्याचा पराक्रम आहे. ग्रंथरूपाने प्रसिद्ध झालेले पुस्तक भावी पिढय़ांना उपयोगी पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी दिशा कल्चर फाउंडेशनच्या कलाकारांनी पोवाडा व स्वागतगीत सादर केले.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा