पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे (वय ४८) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. रविवारी सायंकाळी ४.३० वाजता पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

राजळे यांनी युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली होती. २००४ मध्ये ते शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यांना प्रा. मधू दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कारही मिळाला होता. राज्य सरकारच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केलं होतं. जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांवर ते कार्यरत होते. नगर जिल्ह्यातील एक युवा नेतृत्व अचानक हरपल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब राजळे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे.

२०१४ मध्ये त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या त्यांच्या पत्नी होत. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होत.