सिंधुदुर्गात एकाही शासकीय रुग्णालयात अद्याप ट्रामा केअर युनिट उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांना गोवा, कोल्हापूर किंवा बेळगावला न्यावे लागते, या प्रवासात बऱ्याचदा रुग्ण दगावत असल्याने जिल्ह्य़ात ट्रामा केअर युनिटची उपलब्धता करावी, रक्तपेढी आरोग्य विभागातील रिक्त पदांची समस्या आणि वैद्यकीय सुविधांच्या खासगीकरणाविरोधात अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.
राज्याचे मुख्य सचिव, आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य संचालक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना या जनहित याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. अभिनव फाऊंडेशनच्या वतीने अ‍ॅड्. वीरेंद्र नेवे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १९९९ ला खंडाळा येथील रक्तपेढी पदांसह स्थलांतरित करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांना ही रक्तपेढी संजिवनी देणारी आहे. मात्र तेरा वर्षे झाली तरी या रक्तपेढीला शासनाच्या आकृतिबंधाप्रमाणे कर्मचारी नाहीत. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीला दिलेल्या परवान्याची मुदतही २०१२ मध्ये संपत आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही व्हावी, शासनाच्या आकृतिबंधाप्रमाणे रक्तपेढीतील रिक्त पदे त्वरित भरावीत, वैद्यकीय सुविधांचे खासगीकरण केले जाऊ नये, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. रक्तपेढीतील रिक्त पदांबाबत आरोग्य संचालकांकडे व शासन स्तरावर प्रस्ताव पाठवूनही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयानेच या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सावंतवाडीतून मुंबई-गोवा महामार्ग जातो आणि या मार्गावर सतत अपघात घडत असतात. अपघातातील गंभीर जखमींवर जिल्ह्य़ात उपचार होत नाहीत, तशी यंत्रणा येथे उपलब्ध नाही. अत्यवस्थ रुग्णांना गोवा, कोल्हापूर किंवा बेळगाव येथे पाठवावे लागते, या प्रवासात कित्येकांचा मृत्यू होतो. वर्षांनुवर्षे ही समस्या कायम आहे. त्याकरिता सावंतवाडी येथे ट्रामा केअर युनिट कार्यान्वित करावे, जेणे करून कित्येकांचे प्राण वाचतील. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा