पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली. या आगीवर तब्बल तीन तासांनी नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलाला यश आलं. तोपर्यंत जवळपास 200 घरं जळून खाक झाली होती.

स्वतःची स्वप्नातली घरं जळताना पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. याच घटनेत पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छ संस्थेअंतर्गत शहरातील विविध भागात कचरा वेचण्याचे काम करणारे राजेंद्र कांबळे यांच्या घराचाही समावेश होता. त्यांनी नातेवाईकांकडून काही मदत आणि कर्ज घेऊन तीन मजली घर बांधले. घरामध्ये सर्व साहित्य मांडण्यात आले होते. घरातील सर्वांशी चर्चा करुन 29 नोव्हेंबर रोजी सत्यनारायण पूजा करण्याचे ठरविले. त्यासाठी निमंत्रण पत्रिकाही वाटण्यात आल्या. पूजेला काहीच तास शिल्लक असल्यामुळे जय्यत तयारी सुरू होती. घराच्या आवारात रोषणाईही करण्यात आली होती.

उद्या आपल्या नवीन घराची पूजा म्हणून कांबळे कुटुंबातील सर्व आनंदात होते. पण नियतीला ते काही मान्य नव्हते. कारण त्या आगीत त्यांचं सगळं घर जळून खाक झालं आणि आता उरल्यात फक्त चार भिंती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागली, त्यावेळी माझा मुलगा बाहेर होता, मी आणि माझी पत्नी घरात होतो. आगीची माहिती मिळताच आम्ही सर्व रस्त्याकडे पळालो, आणि आमच्या डोळ्यांसमोर आमचं स्वप्नातलं घर जळत होतं. ते भयानक दृष्य पाहून काय करावं काहीच सुचत नव्हतं. आता काय…आता सगळं सपलंय…आता फक्त सरकारकडे अपेक्षा आहे… सरकारने काहीतरी मदत करावी एवढीच अपेक्षा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजेंद्र यांना चार मुली आणि एक मुलगा असून त्यातील चार मुलींची लग्न झाली आहेत. मुलगा अजून शिक्षण घेतोय.

Story img Loader