पुण्यातील शिवाजी नगर येथील पाटील इस्टेट परिसरात आज दुपारी भीषण आग लागली. जवळपास अडीच ते तीन तास ही आग धुमसत होती. यामध्ये सुमारे 200 झोपड्या जळून खाक झाल्यात.

आग लागल्यानंतर तेथील रहिवाशांनी जमेल त्या प्रकारे, आपला जीव धोक्यात घालून आगीतून वाट काढत आपलं घरातील महत्त्वाचं आणि किंमती सामान वाचवण्याचा प्रयत्न केला. पण याबाबतीत अत्यंत दुर्दैवी ठरले ते म्हणजे उस्मान बाबुलाल शेख. आग लागली त्या पाटील इस्टेट परिसरातच उस्मान यांचं छोटंसं घर होतं. आजारपणामुळे पत्नीला सोबत घेऊन ते सकाळी ११ च्या सुमारास रुग्णालयात गेले होते. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दवाखान्यात सवलत मिळावी म्हणून त्यांनी काही सरकारी कागदपत्र सोबत नेली होती.

‘दुपारच्या सुमारास दवाखान्यातून घरी परतत असताना समोरचं दृष्य पाहून मी जबरदस्त हादरलो. सगळं घर जळून खाक झालं होतं, हातात काहीच राहिलं नव्हतं. दवाखान्यात जाताना आधार कार्ड आणि घरपट्टी जवळ ठेवली होती, आता तेवढंच काय ते माझ्याकडे उरलंय. आता प्रशासनाने मदतीची घोषणा केली आहे. पण माझं घर पुन्हा उभारण्यासाठी सरकारने मदत करावी, आमच्याकडे जी काही कागदपत्रं उरलीयेत त्यांच्याद्वारेच आता मदत करावी. अन्यथा कागदपत्रांअभावी मदतही नाकारली जाईल, तसं होऊ नये. कागदपत्रांमुळे मदतीत आडकाठी केली जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे’ असं उस्मान शेख म्हणाले.

उस्मान शेख यांना दोन मुली असून दोघींची लग्न झाली आहेत, तर एक मुलगा आहे. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतोय. घर जळून खाक झाल्याने त्यांना जबरदस्त हादरा बसला आहे.

Story img Loader