राजकारणाबरोबरच सामाजिक विकासाचा ध्यास असणाऱ्या पाटील कुटुंबीयांची कामगिरी कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उमा भेंडे यांनी शुक्रवारी पेझारी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून झेप महिला औद्योगिक व सहकारी संस्थेच्या वतीने शुक्रवारी पेझारी येथे सुलभा काकू पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकापच्या आ. मीनाक्षी पाटील, जि. प. प्रतोद पंडित पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस शंकरराव म्हात्रे, झेप संस्थेच्या अध्यक्षा चित्रा पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच भावना पाटील, अभिनेत्री उमा भेंडे, राजिप अध्यक्षा कविता गायकवाड, अलिबाग पंचायत समिती सभापती भारती थळे, सुनंदा पाटील, विद्या पाटील, अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, आरपीआय जिल्हा अध्यक्ष जगदीश गायकवाड, अलिबागच्या गटविकास अधिकारी सुपेकर आदी मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सुलभा काकू पुरस्कर सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पूर्वी महिलांना उंबरठय़ाबाहेर पडायला शक्य नव्हते. मात्र अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील सुलभा काकू खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि या परिसरातील महिलांना स्वबळावर जगण्याचे बळ दिले. त्यांचा हा वसा आ. मीनाक्षी पाटील व त्यांची सून ‘झेप’च्या अध्यक्षा चित्रा पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे या पाटील कुटुंबीयांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे त्या म्हणाल्या.
त्यानंतर अलिबाग तालुक्यातील विविध क्षेत्रात पारंगत असलेल्या महिलांना सुलभा काकू पुरस्कर देऊन गौरविण्यात आले. यामध्ये रिक्षाचालक दीपाली मारुती पाटील, कबड्डीपटू सुकन्या नितीन समजिस्कर, प्रगतशील शेतकरीण कीर्ती किशोर पाटील व स्मिता प्रशांत वैद्य, सुजाता मोहन चवरकर, पूजा राजेंद्र समजिस्कर, कुंदा गावंड आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. त्याशिवाय वकृत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या सुहासिनी राजभर, द्वितीय जुईली टेमकर, तृतीय क्रमांकाच्या श्रुती डोंगरे आदी महिलांना देखील पुरस्कर देऊन गौरविण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा