भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनी अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी पवारांच्या चौकशीची मागणी केली असून त्यावर भाजपाची भूमिका काय असं पत्रकारांनी बावनकुळेंना मुंबईतील पत्रकार परिषदेत विचारलं असता त्यांनी अतुल भातखळकर हे अभ्यासू व्यक्तीमत्व असल्याचं म्हटलं.
नक्की वाचा >> विश्लेषण : राऊतांच्या संपत्तीवर जप्ती आणणारं १०३९ कोटींचं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय? कोणी आणि कसा वळवला पैसा?
“पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांची चौकशी करावी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपाची भूमिका काय आहे?” असा प्रश्न पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारला. यावर उत्तर देताना, “अतुल भातखळकर हे अत्यंत हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांनी माननिय शरद पवार यांचा हस्तक्षेप आहे असं त्यांनी पत्र लिहून म्हटलं आहे. तर त्यांच्याकडे काही बाबी किंवा पुरावे असतील म्हणूनच त्यांनी गृहमंत्र्यांकडे ही विनंती केली आहे. तर गृहमंत्री आणि सरकार त्याची चौकशी करतील असं मला वाटतं,” असं बावनकुळे म्हणाले.
नक्की वाचा >> …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा
पत्रकारांनी पुन्हा, “ईडीच्या चार्टशीटमध्ये म्हटलं आहे शरद पवार हे जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा व्हाय बी सेंटरला म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत संजय राऊतांच्या उपस्थितीत पत्राचाळसंदर्भात बैठका झाल्या. त्यानंतर वाधवानला प्रकल्प देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. अर्थात नाव नाहीय पवारांचं चार्टशीटमध्ये” असं म्हणत बावनकुळेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर बावनकुळे यांनी, “हे संपूर्ण केंद्रीय आणि राज्याच्या तपास यंत्रणांचं प्रकरण आहे. याबद्दल जी काही चौकशी होईल ती समोर येईल,” असं उत्तर दिलं.
नक्की वाचा >> ठाकरे की शिंदे? दसरा मेळावा वादात संजय राऊतांची उडी; म्हणाले, “परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी…”
त्याचप्रमाणे बावनकुळे यांनी, “अतुल भातखळकरांनी गृहमंत्र्यांना पत्र दिलं असेल तर गृहमंत्री चौकशी करतील. त्या बैठकीत काय झालं याची चौकशी होईल. यामध्ये जी चौकशी होईल. त्यामधून जे समोर येईल ते महाराष्ट्राला कळेलच,” असंही सूचक विधान केलं.