एकीकडे दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांच्या अटकेमुळे त्यात भर पडली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज तिसऱ्या दिवशी सुनावणी पार पडली. आजही ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. कपिल सिब्बल यांच्यानंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद सादर केला. त्याचवेळी दिल्ली विमानतळावर काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांना अटक झाल्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार सिंघवी यांनी लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्यावर आजच सुनावणी घेण्याचं न्यायालयाने मान्य केलं. दरम्यान, या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं झालं काय?

पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. ते विधान चुकून केल्याचं सांगून त्याबद्दल पवन खेरा यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र, त्यासंदर्भात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे त्यांना आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केली आहे. त्यांना स्थानिक न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतर आसामला नेण्यात येणार आहे.

काँग्रेस नेते पवन खेरांना दिल्ली विमानतळावरून आसाम पोलिसांनी केली अटक

काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान, या प्रकारावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत सरकारवर टीकास्र सोडलं आहे. संजय राऊतांनी या प्रकाराची तुलना आणीबाणीशी केली आहे. “पंतप्रधानपदाचं महत्त्व आम्हाला माहिती आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत टिप्पणी करायला नको. पण हा नियम फक्त आम्हालाच का लागू आहे? भाजपाचे लोक सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी किंवा इतर कोणत्याही नेत्यांवर ज्या प्रकारे टीका करताना भाषा वापरतात, मग आसाम पोलिसांचा कायदा तिथे चालत नाही का?”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“पवन खेरांनी काय विधान केलं हे मला माहिती नाही. पण आसाम पोलिसांनी दिल्लीत जाऊन विमानतळावर अटक करणं यातून काय दिसंतय? मला कुणीतरी सांगितलं की पवन खेरांनी त्या विधानाबद्दल माफीही माहितली. तरीही तुम्ही अटक केली. याचा अर्थ आहे की तुम्हाला तुमचा पोलिसी धाक दाखवायचाय. यालाच तर आणीबाणी म्हणतात ना. कायद्याचा दुरुपयोग यालाच म्हणतात”, असं संजय राऊत म्हणाले.

“कदाचित आसामचे पोलीस त्यांच्या मागेच धावत होते”

“मोठ्या पक्षाचे प्रवक्ते बोलत असताना कधीकधी चूक होते. तशी त्यांची झाली. पवन खेरा काँग्रेसच्या महाअधिवेशनात जात होते. बहुतेक आसामचे पोलीस त्यांच्या पाठीमागे धावत होते की कधी ते विमानतळावर जातायत आणि कधी आम्ही त्यांना विमानतळावरून अटक करू आणि मोठी बातमी होईल. त्यासाठीच पवन खेरांना अटक केली आहे”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

“महाराष्ट्रातही हेच चाललंय. इतरही राज्यांमध्ये हेच चाललंय. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन होतंय. त्याच्या २४ तास आधी तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या आसपासच्या खास लोकांवर, काँग्रेसच्या नेत्यांवर ईडी-सीबीआयचा छापा पडतो. आज पवन खेरांविरोधात कारवाई करण्यात आली.आता ते फक्त आवाज नाही, गळाच दाबतायत ते पूर्ण. हीच आणीबाणी असते”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.