संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकार सध्या स्थिर असून आगामी लोकसभा निवडणुका ही आघाडी एकत्रितपणेच लढवेल. मात्र यूपीएची सत्ता येईलच असे ठामपणे सांगता येत नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी नागपुरात केले.
   काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूर चिंतन शिबिरात आगामी निवडणुकीतील पर्यायांचा विचार न करता पक्ष मजबूत करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. हा सल्ला एकप्रकारे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा संकेत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणुका लढवतील, असे तर्कवितर्क लावले जात असताना, पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएचा घटक पक्ष म्हणून कायम राहील, असे ठामपणे सांगितले. ‘एका घरात नवरा बायकोची भांडणे होतच असतात, तेवढय़ाने ते दोघे वेगळे होत नाहीत,’ असे पवार म्हणाले.
२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढतील. नवे समीकरण दृष्टीपथात नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधींच्या रूपाने काँग्रेसने एका तरुण कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविली असली, तरी आमच्या पक्षात तशी परिस्थिती नाही. राहुल राजकारणात सक्षम असला तरी त्याच्याशी फार संवाद झाला नाही. त्यामुळे त्याच्या राजकीय परिपक्वतेसंदर्भात भाष्य करणार नाही, असे पवार म्हणाले. संघ परिवार दहशतवादी कारवायांत सामील असल्याच्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आरोपांबाबत विचारता त्यांच्या विभागाकडे असलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी हे विधान केले असावे, असे पवार म्हणाले.

Story img Loader