बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लोकसभा निवडणुकीतली लढत पाहण्यास मिळेल या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या आधी रंगल्या आहेत. सुप्रिया सुळे या आता कशी तयारी करणार? तसंच बारामती लोकसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड ठरणार? या चर्चा रंगल्या आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. तसंच अमित शाह यांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळेंचं अमित शाह यांना उत्तर
मागची ५५ वर्षे महाराष्ट्रात कुणीही नेता आला तर तो शरद पवारांना नावं ठेवतोच कारण त्याशिवाय हेडलाईनच होत नाही. त्यामुळे अमित शाह आले होते त्यांनी शरद पवारांवर टीका केली नाही तर हेडलाईन होत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. सध्या आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. लोकांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी होतो. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत. आता लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहोत असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. आमचा प्रचार हा नेहमीप्रमाणे ज्येष्ठांच्या आशीर्वादाने मी प्रचार करते आहे. ज्याला प्रचार करायची इच्छा असेल त्यांनी प्रचार करावा. निवडणूक विचारांनी लढली जाते, आमच्यावर जी काही टीका झाली तरीही मला बरं वाटलं की आमच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. जी टीका अमित शाह यांनी केली तो त्यांचा हक्क आहे.
हे पण वाचा- पवार कुटुंबीय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट नाही! खासदार सुप्रिया सुळे यांचा दावा
पवार कुटुंब, सगळे भाऊ, वहिनी माझा प्रचार करणार
यावेळी माझी चौथी निवडणूक आहे. माझे सहकारी, कार्यकर्ते हे माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबातले लोक हे माझा प्रचार करतात. तसंच पवार कुटुंबातले माझे सगळे भाऊ, वहिनी माझ्या घरातली मुलं, राजूदादा, वहिनी हे सगळे माझ्यासाठी म्हणजेच बहिणीसाठी उभे राहतात. त्याचा मला आनंद आहे. त्यांचाही आधार मला वाटतो असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
३ तारखेला देवेंद्र फडणवीसांशी भेट झाली का? शरद पवार, तुमची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली का? यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलं की या चर्चांमध्ये तथ्य नाही.