राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर काही दिवसांअगोदर आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे मोर्चा काढला होता. यावेळी त्या ठिकाणी चप्पल फेक करत शरद पवार आणि महाविकास आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. शिवाय, कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरासमोर ठिय्या देत आंदोलन देखील सुरू केलं होतं. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती, शिवाय राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटल्या. नंतर घडामोडींना वेग आला आणि आंदोलकांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी त्यांच्या घरून ताब्यात घेत नंतर अटक केली. याशिवाय, आंदोलक कर्मचाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक विधान केलं आहे, शिवाय शरद पवारांवर मोठा आरोपही केला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या नुकसानीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जबाबदार आहेत, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या घरावर दगडाने हल्ला केला नाही, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र माझ्या वाहनावर दगडाने हल्ला होऊन देखील माझ्यावरच गुन्हा दाखल केला गेला. असं पडळकर यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

…तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही आशीर्वाद देतात –

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, “शरद पवारांच्या घरावर जो हल्ला झाला, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. त्या गोष्टीचं कुणीच समर्थन केलं नाही. परंतु पवारांची भूमिका दुटप्पी आहे. माझ्या गाडीवर जेव्हा हल्ला होतो, तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही आशीर्वाद देतात. याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत, हवं तर मी आता देखील देऊ शकतो.”

तसेच, “ म्हणजे एका विधानपरिषद सदस्याच्या जो गरीब घरातून आला आहे, त्याच्या गाडीवरती दगड टाकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल साईटवर टाकताय की आज तुझ्या गाडीवर दगड टाकलाय, उद्या तुझ्या डोक्यात दगड टाकेन. तेव्हा तुम्ही त्याचं समर्थन करतात, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी, अनेक आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलं.” असंही पडळकरांनी यावेळी बोलून दाखवलं.

राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे –

याचबरोबर, “ आगपाडीत माझ्या गाडीवर जवळपास अडीचशे लोकानी हल्ला केला. तेव्हा माझ्यावर ३०७ चा गुन्हा दाखल केला. सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये येतय, पोलीस शुटींग करत आहेत, मात्र यावर काहीच तक्रार होत नाही. परंतु कर्मचारी तुमच्या घराकडे का चालून आले, याचा का तुम्ही अभ्यास केला नाही? १०७ कर्मचारी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून पवारांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. का नाही दाखल केला? करायला पाहिजे होता. कारण, तुम्ही ५० वर्षे त्या लोकाचं नेतृत्व केलं आणि विलिनीकरण करतो म्हणून तुम्ही त्या लोकाना सांगितलं, आशा तुम्ही लावली. त्यामुळे तिथे जे आंदोलन झालंय त्याचं आम्ही समर्थन करत नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची जी दुटप्पी भूमिका आहे, दुसऱ्यावर दगडं टाकली तर टाळ्या वाजवायच्या, त्यांचं अभिनंदन करायचं आणि आपल्या घरावर कर्मचारी चालून आले तर त्यांना तुरुंगात टाकायचं हे बरोबर नाही.” अशा शब्दांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Story img Loader