तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांना नोकरीऐवजी वनटाइम सेटलमेंट प्रश्नी केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार यांनी गोवा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याशी चर्चा केल्याने आंतरराज्य नियंत्रण बोर्डाची लवकरच बैठक होईल, अशी तिलारी प्रकल्पग्रस्तांना अपेक्षा आहे.
महाराष्ट्र व गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने तिलारी आंतरराज्य प्रकल्प ४० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. या प्रकल्पातील सुमारे २०० प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यांत समावून घेतले. मात्र सहाशे प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.
गेली पाच वर्षे प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी दोन्ही राज्यसरकारांकडे पाठपुरावा केला. सध्या नोकऱ्याच उपलब्ध नसल्याने प्रकल्पग्रस्त दाखला धारकांना घरटी एकप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचा निर्णय महाराष्ट्र व गोवा सरकारच्या आंतरराज्य नियामक मंडळाच्या बैठकीत झाला.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष वेधले. त्यामुळे महाराष्ट्र व गोवा सरकारने वनटाईम सेटलमेंटचा निर्णय घेतला पण नेमकी किती रक्कम द्यायची हे ठरले नाही. खुद्द शरद पवार यांनी गोवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून तातडीने पावले टाका असे निर्देश दिले आहेत.
जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आहेत. गोवा या ठिकाणी लवकरच बैठक घेऊन घरटी एकप्रमाणे वनटाइम सेटलमेंट होईल असे सांगण्यात येत आहे. दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थीची यादी बनविली आहे.