केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आयोजित पत्रकारपरिषदेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या खळबळजनक वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. शिवसेनेने या विरोधात अतिशय़ आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच शिवसेना व भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसत आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील यावर अगदी मोजक्याच शब्दात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मला काही बोलायचं नाही. मी त्याला फारसं महत्व देत नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात.” अशा मोजक्याच शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, राज्यात शिवसेनेकडून विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, नारायण राणे यांचे निवासस्थान असलेल्या जुहू येथील बंगल्यावर युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुहू इथल्या नारायण राणे यांच्या घराबाहेर राणे समर्थक आणि शिवसैनिक आमनेसामने आलेल्या मोठा गोंधळ उडाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
राजकारणाचा नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे; जयंत पाटलांची राणेंवर जोरदार टीकास्त्र
“नारायण राणे यांचे वक्तव्य निषेधार्ह आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असं बोलणं हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरलेली नाही. नरेंद्र मोदींनी कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन राज्याला व देशाला कळली,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
“मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणेंचं खळबळजनक विधान!
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, खळबळजनक विधान केल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे भर पत्रकारपरिषदेत राणेंकडून असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं आहे. रायगडमधील महाड येथे केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं आहे. “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक मोहत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” असं राणे म्हणाले होते. या पत्रकारपरिषदेस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची देखील उपस्थिती होती.
“मी काय साधा माणूस वाटलो का?”, अटकेच्या वृत्तावरुन नारायण राणे संतापले
या सर्व घडामोडीनंतर आज माध्यमांशी बोलताना देखील नारायण राणेंनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केली. ”माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून मी काय साधा माणूस वाटलो का? अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.