BJP MLA Shankar Jagtap On PCMC Election : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड मोठ्या विजयासह पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. विधानसभा निवडणुकीतील या विजयानंतर महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा स्वबळावर सर्व जागा लढवणार असल्याची माहिती दिली आहे.

आमदार जगताप यांच्या या विधानानंतर महायुतीतील मित्रपक्ष नाराज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपर्यंत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा (अजित पवार) बालेकिल्ला मानला जायचा. पण, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन केली होती.

दरम्यान राज्यात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाच्या हातात आहे.

महायुती फक्त विधानसभा आणि लोकसभेसाठी…

भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेत शहरातील प्रलंबित कामांची चर्चा केली. यानंतर जगताप यांनी एबीपी माझाशी संवाद साधला होता. यावेळी आमदार जगताप म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने १०० टक्के जागा लढवण्याची तयारी केली आहे. महायुती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत.”

पुढे बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, “स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी ज्या पद्धतीने महापालिकेवर भाजपाची सत्ता आणली होती त्याचपद्धतीने किंबहुना त्यापेक्षा दोन नगरसेवक जास्त निवडून आणण्याचा आमचा मानस आहे.”

हे ही वाचा : Bajrang Sonawane : बजरंग सोनावणेंचा आरोप, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी अजित पवारांच्या ताफ्यातील कारमधून…”

कोण आहेत शंकर जगताप?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा निवडणुकीत भाजपाचे लक्ष्मण जगताप विजयी झाले होते. पण, त्यांच्या आकस्मित निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी चिंचवड मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना संधी दिली. यामध्ये शंकर जगताप यांनी विजय मिळवत विधानसभा गाठली होती. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार शंकर जगताप यांनी महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवण्याची तयारी सुरू केली आहे.

Live Updates
Story img Loader