महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या पाचव्या वर्षांत उत्तर महाराष्ट्रातील जळगावमधील पाचोरा पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. या ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एकूण १५ गावे तंटामुक्त झाली असून त्यातील सहा गावांनी १९० पेक्षा अधिक गुण प्राप्त करत शांतता पुरस्कार पटकाविला. उत्तर महाराष्ट्रातील इतर कोणतेही पोलीस ठाणे अशी कामगिरी करू शकलेले नाही.
गाव पातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कार्यक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील २०११-१२ वर्षांतील तंटामुक्त गावांची यादी शासनाने नुकतीच जाहीर केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील २८७ गावांचा समावेश आहे. या मोहिमेंतर्गत १९० पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. उत्तर महाराष्ट्रात तंटामुक्त ठरलेल्या जळगाव जिल्ह्यातील आठ गावांना हा पुरस्कार मिळाला. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील एकही गाव विशेष पुरस्कार मिळवू शकलेले नाही. शांतता पुरस्कार मिळविणाऱ्या गावांमध्ये एकटय़ा पाचोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील वडगांव खाकुर्डी, बांबरूड प्र. बो., भोरटेक खुर्द, सारोळा खुर्द, टाकळी बुद्रुक, दुसखेडा या गावांचा समावेश असल्याची माहिती पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या गावांनी महत्प्रयासाने हा निकष पूर्ण केला. जळगावचे पोलीस अधीक्षक एस. जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष लक्ष केंद्रीत केले. खुद्द पोलीस निरीक्षक मोरे यांनी सहभागी झालेल्या गावांमध्ये वारंवार बैठका घेऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. तंटामुक्तीचे महत्व पटवून देतानाच दारूबंदी, हुंडा न घेता लग्न सोहळा करण्यास प्रोत्साहन, ग्रामस्वच्छता अभियान असे विविध उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक गावातील तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजात सारखेपणा असावा म्हणून पोलीस ठाण्याने नोंदवह्यांची छपाई केली. ग्रामरक्षक दलास पांढरे टी-शर्ट व जीन्स पॅन्ट असा गणवेश देण्यात आला. न्यायालयांमध्ये दाखल असणाऱ्या तंटय़ांचे संकलन करत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. प्रत्येक गावात जे जे उपक्रम राबविण्यात आले, त्यांची छायाचित्रे काढून त्यांचे संकलन करण्यात आले. ही सर्व माहिती जिल्हा व जिल्हाबाह्य मूल्यमापनात संबंधित समित्यांसमोर मांडण्यात आली. या कामगिरीद्वारे उपरोक्त गावांनी १९० पेक्षा अधिक गुण मिळविण्यात यश मिळविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा