बीडच्या पाटोदा तालुक्यातील मयूर अभयारण्यातील परिस्थिती

बिपीन देशपांडे, औरंगाबाद</strong>

देशातील एकमेव मयूराभयारण्य बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगाव व परिसरात आहे. येथील मोरांवर सध्या अन्न-पाण्यासाठी अधिवास बदलण्याची वेळ आली असून अभयारण्याच्या कार्यक्षेत्राबाहेर मोर जात असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मयूराभयारण्यातील मोरांसाठी तयार केलेले अनेक कृत्रिम पाणवठेही सध्या कोरडेच आहेत. त्यातही टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

नायगाव व परिसराच्या १० ते १२ गावांच्या क्षेत्रांतर्गत असलेले मयूराभयारण्य हे सुमारे १ हजार २०० हेक्टरमध्ये व्यापलेले असून हा सर्व परिसर डोंगररांगांचा आहे. या भागात सुमारे ५ हजारांवर मोरांचा अधिवास आहे. सध्या मोरांवर अन्न-पाण्याच्या शोधात मनुष्यवस्तीतील गावांमधील घर, हॉटेलांपर्यंत जाण्याची वेळ आली आहे. विहीर, बोअर असलेल्या शेतांमध्येही मोर भटकंती करीत आहेत. माणूस दिसला की, भटकंती करणारे मोर बिचकतात व माघारी फिरतात, परिणामी तहानलेल्या अवस्थेतच त्यांना परतावे लागते. पाणी व अन्नाशिवाय त्यांना अशक्तपणा, देवीसारखा आजार जडतो आणि त्यातून अंधत्व किंवा वेळप्रसंगी मृत्यूही येतो.

पाण्याच्या शोधात मोर अभयारण्य क्षेत्राच्या बाहेर जात असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अभयारण्यातील सीताफळे, औदुंबराचे फळ (उंबर), आवळे, कारी बोरे हे मोरांचे खाद्य आहे. मात्र दुष्काळामुळे हेही खाद्य सध्या मोरांना मिळणे दुरापास्त झाले आहे.  वनविभागाकडून त्यांची अन्नपाण्याची व्यवस्था होणे अपेक्षित आहे, मात्र स्थानिक गावकरी मोरांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करीत असल्याचे पहायला मिळते. स्थानिक पातळीवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची परिस्थितीवर नित्य देखरेखही गरजेची आहे, असे नायगाव येथील मयूर मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा नायगावचे सरपंच सय्यद शाहीद सय्यद हबीब यांनी सांगितले.

औरंगाबादहून परिस्थितीवर नियंत्रण

मयूराभयारण्यातील परिस्थिती हाताळण्याचे काम औरंगाबादमधून होते. येथे केवळ एक गेस्ट हाऊस आहे. तेथे कधीतरी एखादा अधिकारी, कर्मचारी येतो. अनेक पाणवठे कोरडेच आहेत. वनविभागाकडून काहीसे दुर्लक्ष होते. येथे कायमस्वरुपी कोणीतरी नियुक्त असावा. स्थलांतरामुळे मोर कार्यक्षेत्राबाहेर गेले तर त्यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

– सय्यद शाहीद सय्यद हबीब, सरपंच, नायगाव.

उन्हाळ्यासारखीच अवस्था

सध्याही उन्हाळ्यासारखीच अवस्था आहे. मयूराभयारण्यात १६ कृत्रिम पाणवठे आहेत. त्यात दीड ते अडीच हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. त्या ठिकाणी ठरावीक दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तर,पाच नैसर्गिक पाणवठे आहेत. तेथे सध्या तरी पाणी आहे. गतवर्षीच्या गणनेनुसार नायगाव परिसरात ४ हजार ६०० मोर आहेत.

– आर. आर. काळे, विभागीय वनाधिकारी, औरंगाबाद.

Story img Loader