पेगॅससच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांमध्ये देशातलं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पेगॅसस स्पायवेअर तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील काही नेतेमंडळी आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन हॅक केले गेल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला असून त्यामागे केंद्रातील मोदी सरकार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्रात देखील पेगॅससचा वापर करून फोन हॅकिंग झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा त्यासाठी इस्त्रायल दौरा झाल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. त्याचसंदर्भात आता मोठा खुलासा समोर आला आहे. हा दौरा माध्यमविषयक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठीच आयोजित करण्यात आल्याचं इस्त्रायल दूतावासाचं पत्र आता व्हायरल होऊ लागलं असून त्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून प्रतिक्रिया देखील देण्यात आली आहे.
DGIPR चा तो दौरा माध्यम तंत्रज्ञानाविषयीच!
सप्टेंबर २०१९मध्ये हा दौरा नियोजित करण्यात आला, तर नोव्हेंबर २०१९मध्ये हा दौना प्रत्यक्षात पार पडला. हा दौरा मुळात माध्यमविषयक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षण आणि अभ्यासासाठी होता असं आता समोर आलं आहे. या दौऱ्यासंदर्भातलं इस्त्रालयच्या मुंबईतील दूतावासाकडून तत्कालीन सचिव ब्रिजेश सिंह यांना पाठवण्यात आलेलं पत्र समोर आलं असून त्यामध्ये नेमका या दौऱ्याचा काय हेतू होता, त्याविषयी माहिती देण्यात आली आहे.
काय आहे पत्रामध्ये?
इस्त्रायल दूतावासाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रामध्ये DGIPR शिष्टमंडळ इस्त्रायलमध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणार आहे, याच्या १० विषयांची यादी देण्यात आली आहे. त्यात सरकारी जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स समजून घेणे, वेब मीडिया वापराचे नवे मार्ग अभ्यासणे, डिजीटल मार्केटिंग, मध्यमांचा वापर, स्मार्ट सिटीमध्ये सरकारी जनसंपर्क यंत्रणेची भूमिका, सायबर क्राईम आणि सायबर सेक्युरिटीसंदर्भात नागरिकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांचा वापर करणे अशा विषयांचा समावेश आहे.
Pegasus Snoopgate: संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करा; नेत्यांवर पाळत ठेवल्याप्रकरणी शिवसेनेची मागणी
दरम्यान, या पत्रावरून काँग्रेसकडून फडणवीसांच्या विधानावर आक्षेप घेण्यात आला आहे.
आदरणीय फडणवीस साहेब, यात शेती व शेती तंत्रज्ञान हा विषय नाही ….. pic.twitter.com/3gN3d1m7en
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) July 21, 2021
संजय राऊतांचे केंद्र सरकारवर आरोप
देशात ज्या प्रकारे Pegasus Spyware या तंत्रज्ञानाचा वापर करून फोन हॅकिंग केले गेले, त्याचप्रकारे महाराष्ट्रात देखील याचा वापर झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप आणि दावे फेटाळून लावले आहेत. त्यासंदर्भात चर्चा सुरू असतानाच हे पत्र समोर आल्यानंतर या प्रकरणावर आता देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाकडून देखील त्यांची बाजू मांडणारं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
Pegasus Spyware : काय म्हणाले होते या दौऱ्याविषयी फडणवीस, वाचा सविस्तर
“मीडियाच म्हणायचं होतं”
“डीजीआयपीआरचा इस्त्रायल दौरा हा मीडियातील बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता. हा दौरा १६ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू झाला. त्यामुळे तो राज्यात सरकार अस्तित्त्वात नसतानाच्या काळात झाला होता. काल यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राज्यात कृषी विभागातर्फे शेतकर्यांचे इस्त्रायल दौरे नेहमी आयोजित केले जातात, तसाच हा दौरा डीजीआयपीआरतर्फे मीडिया बेस्ट प्रॅक्टिसेसच्या अभ्यासासंदर्भात होता, असेच देवेंद्र फडणवीस यांना सांगायचे होते”, असे त्यांच्या कार्यालयासंदर्भात सांगण्यात आले.