अलिबाग: आकर्षक गणेशमूर्तीसाठी प्रसिध्द असलेल्या पेण मधून यंदा २६ हजार गणेशमूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. थायलँण्ड, दुबई, अमेरीका, ऑस्ट्रेलिया, मॉरेशियस, इंडोनेशिया, कॅनडा आणि इंग्लड येथे या मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.
संपूर्ण जगात पेणच्या गणेशमूर्तींची ख्याती आहे. त्यामुळेच देश विदेशात येथील गणेशमूर्तींना मोठी मागणी असते. यावर्षीही विघ्नहर्ता श्रीगणेशाचा सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. पेण तालुक्यातील काही गणेशमूर्ती कार्यशाळांतून शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या २८ हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या नूसार या गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सवाला ७ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे मार्च ते मे या कालावधीत परदेशातील गणेशमूर्ती रवाना करण्यात आल्या. यंदा साधारणपणे १० इंचापासून ६ फूट उंचीच्या गणेश गणेश मूर्ती जेएनपीटी बंदरातून परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Jayant Patil : जयंत पाटलांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “रंगीबेरंगी कपडे…”
४० फूट लांब कंटेनरमध्ये साधारण दीड हजार लहान मूर्ती सामावतात. तर दोन व ७ फूट उंचीचे पाचशे बॉक्स कंटेनरमध्ये बसतात. लहान मोठ्या गणेशमूर्ती मिळून ३० कंटेनरमधून हजारो गणेशमूर्तींनी परदेशात प्रस्थान केले आहे.
गेल्या काही वर्षात परदेशातून पेणच्या गणेशमूर्तींना होणारी मागणी वाढते आहे. गेल्यावर्षी पाच हजार गणेशमूर्ती आम्ही परदेशात पाठवल्या होत्या. यावर्षी आठ हजार गणेश मूर्ती आमच्या कला केंद्रातून परदेशात पाठवल्या गेल्या आहेत. बहूतेक ठिकाणी त्या पोहोचही झाल्या आहेत.
निलेश समेळ, मूर्तीकार
हेही वाचा : शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर इंजेक्शन सिरिज व औषधांचा साठा बाळगून विक्री करणाऱ्याला रत्नागिरीत अटक
मार्च महिन्यात गणेशमूर्ती पाठवण्याचे काम सुरू होते. बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकींग करून या गणेशमूर्ती रवाना केल्या जातात. यंदा जवळपास २६ हजार गणेशमूर्ती यंदा परदेशात पाठविण्यात आल्या आहेत.
श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मूर्तिकार संघटना.