हर्षद कशाळकर, लोकसत्ता
अलिबाग : पेणच्या गणेशमूर्तीना अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पेणच्या गणेशमूर्तीना खऱ्या अर्थाने राजाश्रय प्राप्त होणार आहे.
‘ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी’च्या मदतीने पेण येथील गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक मंडळाने भौगोलिक मानांकनासाठी (जीआय) रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेशमूर्तीचा प्रस्ताव चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यास मान्यता मिळाली आहे. मानांकन मिळविण्यासाठी देशभरातील ३५ उत्पादनांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यापैकी १३ उत्पादने महाराष्ट्रातील होती. यात पेण येथील गणेशमूर्तीचा समावेश होता. त्यास मान्यता मिळाल्याने पेणच्या गणेशमूर्ती व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पेण येथील गणेशमूर्तीना बिगर कृषी घटकात भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. २९ नोव्हेंबरच्या रोजी प्रसिद्ध झालेल्या केंद्र सरकारच्या ‘पेटंट जर्नल’मध्ये ते प्रसिद्ध झाले आहे.
हेही वाचा >>> उत्तर प्रदेश : ‘इंडिया आघाडी’संदर्भात काँग्रेसमध्ये मतमतांतर, बसपाशी युती करण्याचीही काही नेत्यांची भूमिका!
– गु. श. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र रायगड
पेणच्या गणेशमूर्ती नावाखाली भाविकांना सर्रास कोणत्याही भागातील मूर्ती विकण्यात येत होत्या. भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे या प्रकारांना आळा बसेल.
– श्रीकांत देवधर, अध्यक्ष पेण गणेश मूर्तिकार व्यावसायिक संघटना
बदलापूर, बहाडोलीच्या जांभळाला भौगोलिक मानांकन
बदलापूर/पालघर : अवीट गोडीच्या बदलापूर आणि बहाडोलीच्या जांभळाला अखेर भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. भारत सरकारच्या भौगोलिक उपदर्शन पत्रिकेतून देशभरातील भौगोलिक नामांकन बहाल करण्यात आलेल्या पदार्थाची यादी जाहीर करण्यात आली. बदलापूर जांभळाला मोठी मागणी असल्याने बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टने या फळाचे पूर्वीचे स्थान मिळवून देण्यासह झाडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बहाडोली जांभळाचा मोठा आकार, मांसल आणि रसाळ व लहान आकाराची बी असणाऱ्या या फळाला भौगोलिक मानांकन मिळावे या दृष्टिकोनातून बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट स्थापन करण्यात आला़.
‘युनेस्को’च्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत गरब्याचा समावेश
अहमदाबाद : ‘युनेस्को’ने गुजरातच्या पारंपरिक गरबा नृत्याचा ‘अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादी’मध्ये समावेश करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बुधवारी येथे दिली.गुजरातसह देशातील अनेक भागांमध्ये नवरात्रोत्सवादरम्यान सादर करण्यात येणाऱ्या गरबाला या यादीत समाविष्ट करण्यासाठी भारताने नामांकित केले होते. अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या सुरक्षेसाठी कासाने, बोत्सावाना येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या आंतर-सरकारी समितीच्या १८ व्या बैठकीत गरब्याचा यादीत समावेश करण्यात आला. ‘या यादीत समावेश होणारा गरबा हा १५ वा सांस्कृतिक वारसा आहे’, असे अधिकृत पत्रकात नमूद करण्यात आले आहे.