शिवसेना वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदींमध्ये अहंकार भरला आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सगळं त्रांगडं करुन टाकलं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. अशात आता चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

मविआत मुख्यमंत्रिपदाचे पाच दावेदार

मविआत मुख्यमंत्रिपदाचे पाच दावेदार आहेत. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. रोहित पवारांना वाटतं की ते मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीही वाटतं की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. खरंतर यांनी जी मतं घेतली ती खोटं बोलून घेतली. खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये देऊ हे खोटं बोलले. संविधान बदलणार हे खोटं बोलले. आदिवासी समाजाला सांगितलं तुमचे हक्क काढणार असं सगळं खोटं बोलून हे निवडून आलेत. त्यामुळे खोटारडेपणावर यांना मतं मिळाली आहेत. जिथे खासदार निवडून आलेत तिथे साडेआठ हजार रुपये देणार होते. आता ३१ जागी त्यांनी साडेआठ हजारांचं वाटप सुरु करावं.

टोमणे मारुन महाराष्ट्र पुढे जात नाही

मेळाव्यात ते जे काही बोलत आहेत, ते फक्त मनोरंजन आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळले. उद्धव ठाकरे कुठे, मोदी कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? मला याचं उत्तर जरा त्यांनी द्यावं. तसंच ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांत त्यांनी काय काम केलं ते सांगावं. टोमणे मारुन महाराष्ट्र पुढे जाणार नाही. सकाळचा भोंगा राजकीय असतो, भोंगे न वाजवता शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता ते जरा सांगावं. राजकीय भाषणं करायची, खोटी नरेटिव्ह तयार करायची. आता कुठला मुद्दा घेणार आहात? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे काय केलं ते सांगावं? आत्ताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल तेव्हा उद्धव ठाकरे काय सांगू शकणार आहेत? असाही प्रश्न बावनकुळेंनी विचारला आहे.

Uddhav Thackeray on NDA: एनडीएत जाणार? भुजबळ शिवसेनेत येणार? अखेर उद्धव ठाकरे बोललेच

मराठा आरक्षणाचे मारेकरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार

मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत. आता तेच मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत ही आश्चर्याची बाब आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दूर नेण्याचं काम चाललं आहे. सरकारला क्रेडिट द्यायचं नाही पण विकासाची कामं डायव्हर्ट करत आहेत असाही आरोप चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे.