सुपीक जमीन आणि पाणी असूनही या जिल्ह्याचा विकास झाला नाही. याला केवळ नेतृत्व जबाबदार आहे असे नाही, तर जनतेची जबाबदारी मोठी आहे. जोवर जनता नेतृत्वाला विकासाबद्दल जाब विचारत नाही तोवर विकास होणार नाही. परभणी ही आजवर विकास आंदोलनाची भूमी राहिली, पण ती विकासाची भूमी झाली नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी केले.
नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांचा सत्कार गोदावरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आला. त्या वेळी गव्हाणे बोलत होते. व्यासपीठावर खासदार जाधव यांच्यासह माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, कार्यक्रमाचे आयोजक अॅड. अशोक सोनी, सुरेश शर्मा, ओमप्रकाश डागा, अनिल हराळ, डॉ. के. सी. पारेख, किशोर मंत्री, प्राचार्य सोनवणे आदी उपस्थित होते.
गव्हाणे म्हणाले, की परभणी जिल्ह्याला संघर्षांशिवाय काहीही मिळाले नाही. जिल्ह्याने आंदोलनाच्या जोरावरच कृषी विद्यापीठ मिळवले. आज चळवळी अस्तित्वातच नाहीत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या नेतृत्वाने सातत्याने मराठवाडय़ाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करून दुय्यम नेतृत्वालाच महत्त्वाचे स्थान दिले आहे. आजवर जिल्ह्याच्या हक्काचे जे काही आहे तेसुद्धा आम्ही सांभाळू शकलो नाही. त्यामुळे जे आमच्या मालकीचे आहे ते आधी संरक्षित करण्याची जबाबदारी खासदार जाधव यांनी पार पाडावी.
सत्कारानंतर खासदार जाधव मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या निवडणुकीत आपल्याला बरेच काही शिकायला मिळाले. आपली आणि परकी माणसे कोण आहेत त्यातला फरकही कळाला. आजवर ज्यांना सहकार्य केले ते विरोधात गेले आणि ज्यांच्याशी विरोध केला त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणात कोणीच अस्पृश्य नाही. या निवडणुकीत आपल्यावर खालच्या पातळीवर आरोप झाले, मात्र आपण विरोधकांच्या आरोपांना उत्तर न देता जनतेसमोर नतमस्तक झालोत. असे सांगून ज्याप्रमाणे देशात परिवर्तन घडले त्याप्रमाणे राज्यातही परिवर्तन घडले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी मंत्री वरपूडकर यांनी स्थिर सरकारमध्येच विकासाची कामे होतात, असे सांगून आपण केवळ १३ महिन्यांच्या सरकारमध्येच खासदार होतो. त्यामुळे स्थिरतेशिवाय जनतेची कामे करता येत नाहीत. जाधव हे स्थिर सरकारमध्ये निवडून आल्याने भाग्यवान आहेत. कोणतेही नेतृत्व हे एका दिवसात तयार होत नाही. जिल्ह्याची माणसे नेतृत्व जपण्याची कामे करतात. गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण यांच्या विजयाने हेच सिद्ध केले आहे. त्यामुळे कोणीही कोणाला पाडू शकत नाही, असेही वरपुडकर म्हणाले.
प्रास्ताविकात अॅड. सोनी यांनी हा कार्यक्रम राजकीय हेतूने प्रेरित नसून या कार्यक्रमात जिल्ह्याच्या विकासाची दिशा स्पष्ट व्हावी हाच प्रामाणिक हेतू आहे असे सांगितले. या प्रसंगी डागा, तोष्णीवाल आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील मोडक यांनी केले.

Story img Loader