कराड : नरेंद्र मोदी यांनी कितीही धावपळ केली, कितीही सभा घेतल्या, तरी आता त्यांच काही खर नाही. लोकसभेच्या २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने जस काँग्रेसला पराभूत करायचं ठरवलं, तसेच या खेपेस नरेंद्र मोदींना पराभूत करायचं ठरवलं असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. साताऱ्यातून उदयनराजेंचा दीड लाखांच्या फरकाने पराभव होणार असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपने चारशेपार ऐवजी पाचशेपारची घोषणा का दिली नाही? आणि चारशेपार खासदार येणारच असतील, तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याचे त्यांचे कारण काय? अशी खोचक टिपणी करून, चव्हाण म्हणाले, भाजपचे चारशेपार वगैरे काही सोडा, नरेंद्र मोदी सत्तेतच येणार नाहीत. कराडमध्ये उद्या येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारचा १० वर्षाचा हिशोब द्यावा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदी बोलतात. पण, त्यांनी आपल्या १० वर्षाच्या सत्ताकाळात काय केले? ते का हे सांगत नाहीत अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

आणखी वाचा-सुनेत्रा पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ विधानावरून धनंजय मुंडेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले, “कुणी आपल्या सुनेला परकं म्हणत असेल, तर…”

उदयनराजेंचा दीड लाखाने पराभव होईल

राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत ९० हजारांनी पराभव केला होता. आता उदयनराजे दीड लाखांच्या फरकाने निश्चित पराभूत होतील असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

लोकसभेच्या २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याने आम्ही त्यांचा उत्तमप्रकारे प्रचार केला आणि ते चांगल्या मतांनी निवडूनही आले. पण, उदयनराजे लगेचच भाजपत जाऊन त्यांनी पोटनिवडणूक लावली. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र असताना आम्ही उदयनराजेंचा ९० हजार मतांच्या फराकाने पराभव केला. आतातर शिवसेनाही सोबत असल्याने तीन पक्षांच्या ताकदीमुळे किमान दीड लाखांच्या फरकाने उदयनराजेंचा पराभव झाल्याखेरीज राहणार नसल्याचे चव्हाण यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा-“मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते”; छगन भुजबळ यांचा खोचक टोला

उदयनराजे त्यावेळी चांगलेच भडकले

पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१९ च्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या पराभवाचे भाकीत केले आणि उदयनराजे अपेक्षेप्रमाणे चांगलेच भडकले होते. तर, सातारा मतदारसंघातील धक्कादायक निकालात उदयनराजेंचा मोठा पराभव झाल्याने उदयनराजेंचा पृथ्वीराज चव्हाणांवर रोष राहिला आहे. आताही चव्हाणांनी पुन्हा उदयनराजेंचा गतखेपेपेक्षा अधिकच्या फरकाने पराभवाचा दावा केल्याने विशेषतः राजेगट आणि भाजपच्या गोटात याची गांभीर्याने चर्चा होत आहे.

राजकीय वातावरण चांगलेच तापले

भाजपकडून खासदार उदयनराजे भोसलेंविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यात कडवा संघर्ष होत असताना, महायुती आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची कडाक्याच्या उन्हात बरसात होत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आणखी वाचा-“अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात येऊ नये, अन्यथा…” भास्कर जाधव यांचा इशारा

शरद पवारांचा दावा अन् इशाराही

शरद पवारांनी काल माढ्यातून धैर्यशील मोहिते- पाटील आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे हे आपले दोन्ही उमेदवार एक लाखांहून अधिकच्या मताधिक्याने जिंकतील असे ठामपणे सांगितले होते. तर, मुंबई बाजार समितीत घोटाळा झाल्याच्या जुन्या प्रकरणात शशिकांत शिंदे यांच्यावर ऐन निवडणुकीत अटक झाल्यास राज्यभर तीव्र संघर्षाचा इशारा पवारांनी दिला आहे. त्यामुळे पवारांच्या दहिवडी व पाटणच्या सभा गाजत असतानाच पृथ्वीराज चव्हाणांनी उदयनराजेंच्या आणखी मोठ्या पराभवाचे भाकीत केल्याने याला उदयनराजे आणि भाजप नेते कसे उतरतात याकडे मतदारांच्या नजरा लागून राहणार आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींची कराडमध्ये उद्या सोमवारी होणाऱ्या सभेत ही मुलुख मैदानी तोफ पृथ्वीराज चव्हाणांच्या घराच्या मैदानावर त्यांचा व शरद पवारांसह महाविकास आघाडीचा काय समाचार घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People decided to defeat congress and now they will defeat modi too says congress leader prithviraj chavan mrj
Show comments