नारायण राणे यांना मुख्यमंत्री करूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रतारणा करणाऱ्या राणेंचा पराभव ही खरे तर शिवसेनाप्रमुखांना कोकणवासीयांनी श्रद्धांजलीच वाहिली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
आमदार दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत असताना माजी आमदार पुष्पसेन सावंत, माजी जिल्हाध्यक्ष बाळा भिसे, नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे उपस्थित होते.
कोकणच्या जनतेने शांतता पाळत दहशतवादाविरोधात मतदानातून कौल दिला आहे. नारायण राणे यांच्या कार्यपद्धतीला जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे. राणे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपदही सोडले नव्हते, एवढी घट्ट पकड मंत्रीपदातून जिल्ह्य़ावर त्यांनी ठेवली होती, असे आम. केसरकर म्हणाले.
भारतात मोदी लाटही होती. त्यामुळे भाजपाला आघाडी मिळाली आहे. कोकणच्या जनतेने राणे संस्कृतीविरोधात मतदान करून शिवसेनेच्या विनायक राऊत यांना लीड मिळवून दिले आहे. सावंतवाडी या माझ्या विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना ४२ हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. शवसेना-भाजप महायुती व राष्ट्रवादी काँग्रेसची तिघेजण वगळता सर्व टीम लोकांपर्यंत पोहचली असे आम. केसरकर म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला पवार साहेबांचा पाठिंबा नव्हता, त्यांनी काँग्रेससोबत रहावे असा आदेश दिला होता, पण जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी जनतेसोबत राहिली.
जनतेचा लढा मानून सर्वानी एकदलाने राणे यांना विरोध केला. हा विरोध काँग्रेसला नव्हता असे सांगताना आम. दीपक केसरकर म्हणाले, आयुष्यात अनेकानी काँग्रेस विरोधात प्रथमच मतदान केले अशी संख्या मोठी आहे.
जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेसने राणेंच्या विरोधात ताकद उभी केली. हा विजय जनतेचा आहे. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या लोकांनीही काँग्रेसला साथ दिली नाही.
सर्वच जणांनी राऊतांना मदत केली असे आमदार दीपक केसरकर यांनी बोलताना सांगितले. नारायण राणे यांना माझा व्यक्तिगत विरोध नाही, पण दहशतवादाला आम्ही विरोधच केला. ही लढाई यापुढेही सुरूच राहील.
रायगड व रत्नागिरी लोकसभा मतदार संघाची तुलना मोदी लाटेत केल्यास राणे यांच्या विरोधातील लोकांचा उद्रेक बाहेर पडला तसा तो रायगड मतदार संघात नव्हता असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तिघे जण वगळता सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही लढाई स्वार्थासाठी केलेली नाही. सर्वानाच राष्ट्रवादी काँग्रेस प्रिय असून राष्ट्रवादी पक्ष वाढावा असेच वाटते, पण जनतेला राणे नकोसे झाले होते. त्याविरोधात आम्ही सर्वानी प्रतिनिधित्व केले, असे आमदार केसरकर म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माझे डिपॉझिट जप्त करणार, अशी भाषा करणाऱ्या नारायण राणे व समर्थकांना सुमारे ४२ हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून झणझणीत प्रकाशझोत टाकला आहे. नारायण राणे यांनी आता त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे द्यावा आणि राजकारणाच्या कार्यपद्धतीत बदल करावा, नम्रता बाळगावी, असे आम. केसरकर म्हणाले.
शिवसेना प्रमुखांनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री करूनही त्यांचा अपमान केला. त्यामुळे राज्यात शिवसेनेला उर्वरित १५ जागांवर विजय मिळाला त्यापेक्षा या मतदारसंघातील विजयाचा आनंद कै. बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक झाला असता, असे आम. केसरकर यांनी सांगून हा विजय जनतेचा असल्याचे म्हटले आहे.
शरद पवार यांना मी वडीलकीचा मान देतो. ज्येष्ठत्व मानतो पण माझा लढा तत्त्वाशी व जनतेसोबत असल्याने त्यांचा शब्द पाळू शकलो नाही, असे सांगताना उदय सामंताची प्रतिष्ठाही पणाला लागली होती असे आम. केसरकर म्हणाले. जिल्ह्य़ात फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खरे तर मी आज सावंतवाडीत थांबणार नव्हतो पण पळून गेलो असा अपप्रचार करणार म्हणून थांबावे लागले. जनतेचा कौल मतदानातून स्पष्ट झाल्याने जनतेचे आभार आम. केसरकर यांनी मानले.

Story img Loader