निवडणुकीत ओतला जाणारा पैसा घामाचा नाही, तर तो पापाचा आहे हे लक्षात ठेवा. मतांच्या पैशातून दोन दिवसांची चूल पेटेल. परंतु, पाच वष्रे तुमची चूल विझलेलीच राहील, तरी पैशावर मत विकू नका, असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. जनतेचा दगडांच्या देवावर विश्वास आहे, पण आघाडी सरकारच्या जिवंत मंत्र्यांवर विश्वास उरलेला नाही. दगडाला पाझर फुटेल, पण या मंत्र्यांना पाझर फुटत नसल्याचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पाटणनजीकच्या दौलतनगर येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. सेनेचे माजी आमदार शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सेनानेते आमदार सुभाष देसाई, दिवाकर रावते, सेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम उपस्थित होते. फलटणचे नंदकुमार तासगावकर, कोरेगावचे पुरूषोत्तम माने, कोयनानगरचे हरिष भोमकर, जयसिंगराव शेंडगे यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमात ज्योतिबा देवाची चांदीची मूर्ती देऊन उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, की ज्योतिबाचा आशीर्वाद आणि जनतेचा पाठिंबा यावर पश्चिम महाराष्ट्रात भगव्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शंभूराज देसाई यांचा विजय निश्चित आहे. कुलदैवतांच्या मंदिरांचे सुशोभीकरण हा मुख्य अजेंडा आम्ही घेतला आहे. त्याअंतर्गत ज्योतिबा मंदिर परिसराचा विकास त्याचे प्राधिकरण स्थापन करून करणार आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणजे दिल्लीवरून इंपोर्ट केलेले पार्सल आहे. त्यांच्यामुळे राज्याचे अतोनात नुकसान सुरू आहे. त्यांना जनताच योग्य जागा दाखवेल. आघाडी सरकार जाहिरातबाजीवर जेवढा खर्च करीत आहे, तेवढय़ात एखादे धरण पूर्ण झाले असते अशी टीका त्यांनी केली. आपले सोबतीही आहेत, याची माहिती मुख्यमंत्र्यांना नाही, ते राज्याचा कारभार काय करणार, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या कारभाराला जनता वैतागली असून, त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसेल असा दावा त्यांनी केला. सीमाप्रश्न महाराष्ट्र सरकार सोडवू शकत नाही. कर्नाटककडून मात्र हा वाद मिटला आहे असे सांगितले जात आहे. त्यावर आमचे मुख्यमंत्री बोलतच नाहीत. कोर्टात काय ते म्हणणेही देत नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
शंभूराज देसाई यांनी उद्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असा ठाम विश्वास व्यक्त केला. लोकनेत्यांचा वारसा व शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद पाठीशी असून, भगव्याची शान राखण्याचे काम आम्ही केले आहे. आजची ही उपस्थिती पाहून येथील वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपण आमदार म्हणून येणारच असून, आपल्याला स्वत:ला काही एक मागणार नाही. केवळ पाटण मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावा, विकास कामाला साथ द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हर्षद कदम यांचे भाषण झाले. कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर, सुजित मिणचेकर, विजय शिवतारे यांची उपस्थिती होती. दरम्यान, हजारो तरूणांनी काढलेल्या भव्य रॅलीने देसाई गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन झाले.
आघाडी सरकारवर जनतेचा विश्वासच नाही – उद्धव ठाकरे
निवडणुकीत ओतला जाणारा पैसा घामाचा नाही, तर तो पापाचा आहे हे लक्षात ठेवा. मतांच्या पैशातून दोन दिवसांची चूल पेटेल. परंतु, पाच वष्रे तुमची चूल विझलेलीच राहील, तरी पैशावर मत विकू नका, असे कळकळीचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
First published on: 24-08-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People do not believe on coalition uddhav thackeray