सावंतवाडी  : काय डोंगर, काय झाडी या गुवाहाटीमध्ये मी केलेल्या वक्तव्यावर मला जगभर प्रसिद्धी मिळाली, ही भगवंताची कृपा मानतो. कोकण हे माझंच काय, महाराष्ट्राच्या काळजाचा घड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदूवी स्वराज्याची राजधानी कोकणातच आहे, तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणातून शिवसेनेची निर्मिती करून महाराष्ट्रात विस्तार केला आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले.

सावंतवाडी शहरात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि भाजपचे जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर परब यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, १९९५ मध्ये तत्कालीन आमदार गणपतराव देशमुख यांचा पराभव केल्यानंतर जेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रसिद्धी आता मला मी गुवाहाटी येथे काय झाडी, काय हॉटेल या वक्तव्याने मिळत आहे. ही सर्व देवाची देणगी असल्याचे सांगत आमदार शहाजी पाटील यांनी कोकणातील डोंगर लय भारी असल्याचे सांगितले, तसेच आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात केलेला नवा प्रयोग जनतेला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांनी आमचे मतदारसंघ आणि शिवसेना संपवण्याच्या केलेल्या कृतीमुळे छातीवर दगड ठेवून ४० ते ५० आमदारांनी निर्णय घेतला आहे. आमदार पाटील म्हणाले, सिंधुदुर्गच नाही तर संपूर्ण कोकणशी माझे वेगळे नाते आहे. मी १९८५ च्या दरम्यान निरीक्षक म्हणून आलो होतो. आपण राजकारणात शरद पवार यांना घाबरता का असे विचारता त्यांनी कशाला कोणाला घाबरू असे म्हणत देवाला सोडून मी कोणाला घाबरत नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच अंधेरी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचेही या वेळी आमदार पाटील म्हणाले.

Story img Loader