नितीन बोंबाडे, लोकसत्ता
डहाणू : डहाणू, तलासरी तालुक्याला मागील दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंप बसले आहेत. भूकंपाची मालिका ही सुरूच असून तालुक्यातील अनेक गावांतील भूकंपग्रस्त कुटुंबांचे त्यात नुकसान झाले आहे आणि होत आहे. मात्र त्यांची शासनदरबारी नुकसानभरपाई म्हणून मिळणारी मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्यासाठी त्यांची होणारी ससेहोलपट अद्यापही सुरू आहे.
डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री भूकंपाचा पहिला धक्का बसला.त्यानंतर दोन वर्षांत एकूण ९३ लहान-मोठे धक्के बसले आहेत. ४.३ रिश्टर स्केलचा सर्वात मोठा धक्का बसल्याची नोंद येथे झाली आहे. भूकंपात ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे शासनाने अशा घरांचे पंचनामे केले. परंतु मध्यम स्वरूपात नुकसान झालेली असंख्य कुटुंबे शासनाने तयार केलेल्या आराखडय़ात बसत नसल्याने त्यांचा पंचनामा झालेला नाही. भूकंपामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना सरसकट २ लाखांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची मागणी माकपचे आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने डहाणू, तलासरीतील भूकंपसदृश भागात भूकंपरोधक घरे बांधण्याची सक्ती केली आहे. मात्र शासनाकडून घरकुलासाठी १ लाख ६० हजारांची रक्कम अदा केली जाते. या रकमेत भूकंपरोधक घरे बांधणे अशक्य असल्याने शासनाने घरकुलाची रक्कम ३ लाख ६० हजार करावी अशी शिफारस जिल्हा प्रशासनाने डहाणू आणि तलासरी गटविकास अधिकाऱ्यांना केल्याचे सांगण्यात आले. या भागात फॉल्ट लाईन कार्यान्वीत आहे, असे जिल्हा प्रशासनाला आयएमबीने दिलेल्या माहितीत सांगण्यात आले. या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. हे हादरे बसण्यामागचे कारण असू शकते, असा अंदाज विवेकानंद कदम यांनी बांधला आहे. लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. भुकंपाच्या भितीने घाबरुन जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम यांनी केले आहे.
प्रशासकीय दावा, मात्र प्रत्यक्षात भरपाई नाही
डहाणू तालुक्यातील १६ ग्रामपंचयतींमध्ये १६७४ घरे तर तलासरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींमधील ३६३ घरांना नुकसानभरपाई दिल्याचा प्रशासनाचा दावा असला तरी भूकंपाची झळ पोहोचलेली डहाणू, तलासरी तालुक्यातील मध्यम स्वरूपात नुकसान झालेली हजारो कुटुंबे उपेक्षितच आहेत. धुंदलवाडी, वंकास, पुंजावे, हळदपाडा, कुर्झे, कवाडा, उधवा, वडवली, आंबोली, धामणगाव, दापचरी, बहारे, आंबोली, हळदपाडा, गंजाड, नवनाथ, धानीवरी, रानशेत, ओसरविरा, मोडगाव, रायपूर, आष्टा यांसह अनेक गावांत नुकसानग्रस्तांची मदतीसाठी ससेहोलपट सुरूच आहे.
भूकंपरोधक घरांबाबत उदासीनता
भूकंपरोधक घरांमध्ये आरसीसी घरे बांधतात. घरांना बीम, कॉलम तसेच बांधकामामध्ये सीमेंटचा जास्त वापर करणे, लेंटन घेणे आदी कामांचा दर्जा असणे गरजेचे असल्याची माहिती देण्यात आली. २०१८ पासून वारंवार सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेनंतरही प्रशासनाकडून एकही भूकंपरोधक घर बांधले गेले नाही, अशी शोकांतिका आहे.
मदत आणि जनजागृती
जिल्हा प्रशासनाकडून भूकंपामुळे नुकसान झालेल्या घरांना आतापर्यंत १ कोटी ३० लाख रुपये खर्च केल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे अधिकारी विवेकानंद कदम यांनी दिली. याव्यतिरिक्त एनडीआरएफकडून २०० तंबू तसेच गावामध्ये टेन्ट बांधण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने प्रत्येक कुटुंबाला ताडपत्री आणि बांबूचे वाटप केले आहे. गावागावात प्रात्यक्षिके दाखवून, माहिती पुस्तके, कार्टुनच्या माध्यमातून जनतेपर्यंत जनजागृती केल्याचे सांगण्यात आले. आश्रमशाळांना तंबू बांधून देण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीत शाळा बंद आहेत.