लोकसत्ता प्रतिनिधी
सातारा : जनतेच्या पाठिंब्यावर पाचव्यांदा आमदार होऊन मंत्री आणि आता पालकमंत्री झालो. चुकीचं काम करणाऱ्यांना पोलीस संरक्षणाची गरज असते. मी कुठल्याही चुकीच्या गोष्टी केल्या नसल्याने मला पोलीस संरक्षणाची गरज नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना सांगत सुरक्षा व्यवस्था नाकारली. माझ्या ताफ्यात भोंगा वाजवायचा नाही, अशा सक्त सूचना केल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर सभेत सांगितले. राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्रिपदी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची वर्णी लागल्याने विलासपूर (सातारा) येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
जनतेच्या आशीर्वादाने पाचव्यांदा आमदार झालो आणि मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. काही कार्यकर्ते सांगत होते की, पोलीस वगैरे असं तसं असतं, पण शेवटी मला माहीत आहे की मंत्रिपद आज आहे तर उद्या नसेल ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे डोक्यात या गोष्टी जाऊ द्यायच्या नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. जे चुकीचे काही करतात त्यांना पोलिसांच्या संरक्षणाची गरज असते. आपण कुठं काही चुकीचं केलेलं नाही. कुणाचं काही काढून घेतलेलं नाही. लाटालाटी करणाऱ्यांना पोलीस संरक्षण लागते, मला गरज नाही असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
आणखी वाचा-राज्यातील पारंपरिक विणकरांना मदतीचा हात! राज्य शासनाच्या वतीने दिला जाणार ‘उत्सव भत्ता’
कुणाचं काही लाटलेलं नाही किंवा कुठं चोऱ्यामाऱ्या केलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने प्रोटोकॉल म्हणून सुरक्षेसाठी दोन गाड्या दिल्या होत्या. मात्र, त्या दोन्हीही गाड्या मी परत पाठवून दिल्या. त्यावेळी यापूर्वीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा मला फोन आला. साहेब एक गाडीतरी ताफ्यात ठेवा. तुम्ही कामासाठी दौरे करताना लोक येणार. अडचणी येऊ शकतात, अशी विनंतीही त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं की, सुरक्षेसाठी गाडी घेतो पण ती गाडी पुढे जाता कामा नये. ती गाडी मागेच ठेवायची. ती गाडी पुढे गेली आणि सायरन सुरू झाला तर गावातील लोक मला शिव्या देतील. कालपर्यंत बाबा एकटे फिरायचे आज मात्र भोंगा वाजवत फिरतात असं लोक म्हणतील. माझ्यासोबत असताना साताऱ्यासह कुठेही असताना अजिबात गाडीचा सायरन वाजवायचा नाही, अशी सक्त सूचना पोलिसांना दिली.
आणखी वाचा-साताऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात वनक्षेत्रपालासह पाच कर्मचारी जखमी
लोकांना त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही, असे बजावले आहे. मला माहीत आहे, आपण सिग्नलवर किंवा वाहतूक कोंडीमध्ये असतो अशावेळी भोंगा वाजत आल्यावर आपल्यालाच वैताग येतो, मग दुसऱ्यांना कसं वाटत असेल? आपल्यावरूनच दुसऱ्यांचाही विचार करायला हवा. आमदाराचा मंत्री झालो म्हणून मी काहीही करू शकतो, असे नाही. मी मंत्री झालो आणि त्यानंतर आता लातूरचा पालकमंत्री झालो तरी मी सातारकर आहे हे लक्षात ठेवा, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. यावेळी नगरसेवक शेखर मोरे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण, व्यंकटराव मोरे, शशिकांत पारेख, धनश्री महाडिक, बाळासाहेब महामूलकर, रूपाली पवार, नीळकंठ पाटील, रवी पवार, पूनम निकम, पोपटराव मोरे, मालती साळुंखे, सुनील मोरे, राजू मोरे, नगर विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.