आगामी लोकसभा निवडणुकीत छगन भुजबळ उमेदवार असो किंवा समीर भुजबळ, लोक त्यांना नाकारतील, असा दावा आम आदमी पक्षाकडून नाशिक मतदार संघात उमेदवारी जाहीर झालेले ‘मेटा’चे निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी केला. येथे आयोजित पत्रकार परिषदेत पांढरे यांनी आगामी निवडणूक ही कोणत्याही दोन जातींच्या उमेदवारांमध्ये नसून भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारमुक्त या दोन वृत्तींमध्ये होणार असल्याचे सांगितले.
लोकांना भुजबळ यांच्या ताब्यातील शैक्षणिक संस्था, सार्वजनिक बांधकाम विभाग, तेलगी प्रकरण यातील भ्रष्टाचार माहीत आहे. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या असंतोषाचे प्रतिबिंब मतांमध्ये परावर्तीत झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे निवडणुकीत आपल्याविरूध्द कोणते भुजबळ उमेदवारी करतील, याविषयी फरक पडत नसल्याचे पांढरे यांनी नमूद केले. पैसे देणाऱ्या उमेदवारांना लोकांनी मत देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. शासकीय योजनांसाठी असणारा निधी योजनेवर खर्च न होता भ्रष्ट राजकीय मंडळी मध्येच खाऊन टाकतात. त्यामुळे योजना पूर्ण होऊ शकत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर आला असताना अजून कोणत्याही कामांना सुरूवात नाही. ही कामे होणार कधी असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.