‘‘मराठवाडय़ातील लोकांना मागास म्हणून संबोधले जाते. मात्र, या मागास भागातील लोकच अधिक जागरूक असतात. याचाच लाभ यूपीएससी परीक्षेत आपल्याला झाला,’’ अशी प्रतिक्रिया या परीक्षेत महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावलेल्या कौस्तुभ दिवेगावकर याने व्यक्त केली.
लातूरच्या केशवराज विद्यालयात शालेय शिक्षण झालेल्या दिवेगावकरने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीए मराठी, तर नांदेड विद्यापीठातून एमए मराठीची परीक्षा दिली. यूपीएससी परीक्षेवर लक्ष केंद्रित करून त्या दृष्टीने अभ्यास केला व घवघवीत यश संपादन केले. लातूर येथील युनिक अॅकॅडमीचे प्रवीण चव्हाण यांचे आपल्याला चांगले मार्गदर्शन लाभल्याचे दिवेगावकर याने सांगितले.
लातूरचीच क्षिप्रा आग्रे महाराष्ट्रात दुसरी आली. यूपीएससी परीक्षेसाठी तिने क्लासवर अवलंबून न राहता स्वत: मेहनत केली. आई-वडिलांनी पाठबळ दिले. त्यामुळे आपल्याला चांगले यश मिळाल्याचे क्षिप्राने सांगितले. लातूरची मुले प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे क्षिप्राने सांगितले.
‘लोकसत्ता’चे विशेष आभार
‘‘ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी मी मराठी भाषेचेच माध्यम निवडले होते. मराठीतच मी अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतो. या माध्यमामुळेच मी हे यश मिळवू शकलो. यूपीएससीसाठी प्रादेशिक भाषांचा पर्याय हवाच. ‘लोकसत्ता’ ने यूपीएससीतील मराठी भाषेचा मुद्दा लावून धरला होता, त्याबद्दल लोकसत्ताचे विशेष आभार,’’ असेही दिवेगावकर याने सांगितले.