मंगळवार तळे तसेच मोती तळ्यात गणेश विसर्जनाची लागलेली सवय एकदम नष्ट होत नाही त्यामुळे या वर्षी या तळ्यात सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास शासनाला परवानगी द्यावी लागेल, असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दिपत्रकाव्दारे व्यक्त केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर जनेतेचे प्रबोधन करण्यात येत असले तरी पध्दत एकदम नष्ट होत नाही असे ही पत्रकात म्हटले आहे.
सातारा येथील मंगळवार तळे आणि मोती तळे या दोन तळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती विसर्जति न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रदूषणामुळे येथील नागरिक त्रासल्याने हा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयामुळे विसर्जन कोठे करायचे याबाबत पेच निर्माण झाला होता. नगर पालिकेने कृत्रिम तलाव तयार केले होते, मात्र ते पुरेसे नाहीत हे लक्षात आल्यावर पर्यायी व्यवस्था कोणती या प्रश्नावर भोसले यांनी या पत्रकातून आपले मत व्यक्त केले.
मंगळवार तळ्यात मोठय़ाप्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास होतो म्हणून या तळ्यात विसर्जन नको अशी भूमिका नगरसेविका हेमांगी जोशी यांनी मांडली होती. मंगळवार तळ्यास भेट दिली असता विसर्जन करू नका, असा निर्णय आपण घेतला होता. मात्र सक्षम व्यवस्था नगरपालिका किंवा जिल्हा प्रशासन करू शकली नाही. कृत्रिम तळ्यांच्या खर्चाचा भार नगरपालिकेला उचलावा लागत आहे. त्यामुळे प्रबोधनाच्या माध्यमातून जोपर्यंत शाडूच्या मातीची तसेच लहान मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत मोती तळ्यात तसेच मंगळवार तळ्यात विसर्जनास परवानगी देणे संयुक्तीक आहे. नवरात्रोत्सव झाल्यावर नगरपालिकेने ही तळी युध्द पातळीवर साफ करावीत, असे ही पत्रकात म्हटले आहे. मंगळवार तळे विकास प्रतिष्ठानसारख्या सामाजिक संस्था सफाईसाठी पुढे येणार असतील तर नगरपालिकेने स्वच्छता मोहीम हातात घेऊन स्थानिकांना त्रास होणार नाही, अशी व्यवस्था करावी असेही पत्रकात म्हटले आहे.
मंगळवार तळे, मोती तळ्यात गणेश विसर्जनाची परवानगी द्यावी लागेल – उदयनराजे भोसले
मंगळवार तळे तसेच मोती तळ्यात गणेश विसर्जनाची लागलेली सवय एकदम नष्ट होत नाही त्यामुळे या वर्षी या तळ्यात सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यास शासनाला परवानगी द्यावी लागेल.
First published on: 01-09-2014 at 02:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Permission to ganesh visarjan to mangalwar lake