राहाता : शासनाने राज्यातील परमिट रुम, वाईन शाॕप व बियर बारमधून होणाऱ्या मद्य विक्रीवरील व्हॕट टॕक्समध्ये १० टक्के तसेच परवाना नुतनीकरण शुल्कात वाढ केल्याच्या निषेधार्थ तसेच सदरची टॕक्स व परवाना नुतनीकरण शुल्कवाढ रद्द करावी, अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी
या मागणीसाठी गुरुवार (दि.२०) रोजी तालुक्यातील तसेच राज्यातील परमीट रुम ,वाईन शाॕप व बियर बार व्यवसाईक मद्यविक्री बंद आंदोलन करणार असल्याची माहिती तालुका परमिट रुम व वाईनशाॕप ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नानासाहेब जोंधळे यांनी दिली. याबाबत माहिती देताना जोंधळे यांनी सांगीतले की,राज्य शासनाने महसुली उत्पन्न वाढीसाठी राज्यातील परमिट रुम,वाईनशाॕप व बियर शाॕपीमधुन होणाऱ्या मद्य विक्रीवर १० टक्के व्हॕट टॕक्स तसेच परवाना नुतनीकरण शुल्कातही वाढ केली आहे.
याचा फटका परमिटरुम,वाईन शाॕप व बियर शाॕपी व्यावसायिकांना बसणार आहे.यापूर्वी अनेकदा अशाप्रकारे करवाढी केल्या गेल्या आहेत. त्याची झळ संबंधित व्यवसायिकांना बसत असुन मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सदर व्हॕट टॕक्स व परवाना नुतनीकरण शुल्कवाढ रद्द करावी या मागणीसाठी राज्यासह तालुक्यातील परमिट रुम,वाईन शाॕप व बियर शाॕपी व्यावसायिक मद्य विक्री बंद”आंदोलन करणार असल्याची माहिती जोंधळे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने परमीट रूमधारकांच्या एफ. एल. थ्री. विक्रीवरील वाढविलेला दहा टक्के अतिरिक्त व्याज, कर रद्द करावा. तो थेट उत्पादकांकडून वसूल करावा. यामुळे परवानाधारक आणि वाईन शॉप या दोन्ही ठिकाणी एकच कर लागू होऊन, सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच, अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नियमांना केराची टोपली
राज्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये ढाबे तसेच हॉटेल्ससह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मद्य विक्री होत आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून अनधिकृत मद्य विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होत नसल्याने त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. यामुळे शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत सर्रास अनधिकृत मद्यविक्री सुरू असल्याने परमीटरूम, बार अँड रेस्टॉरंट चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशी माहिती एका व्यावसायिकांने भितीपोटी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.