शिवाजी विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष पदवीच्या पर्यावरण विषयासाठी रविवारी झालेल्या पेपरच्या वेळेत परीक्षा विभागाने गोंधळ घालूनआपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. याचा मनस्ताप मात्र विद्यार्थ्यांना भोगावा लागला.
शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. व बी.कॉम. पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून लोकसभा निवडणुकीमुळे द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षेतील पर्यावरण विषयाचा पेपर रविवारी घेण्यात आला. बी.ए. साठी सकाळच्या सत्रात ११ ते १ आणि ११ ते २ अशी वेळ निर्धारित करण्यात आली होती. ७० गुणांसाठी सत्र पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन तासांचा अवधी तर १०० गुणांची पुर्नपरीक्षांर्थीसाठी तीन तासांचा अवधी देण्यात आला होता. अशीच वेळ सायंकाळच्या सत्रात होणाऱ्या बी. कॉम. भाग-२ च्या विद्यार्थ्यांसाठी ३ ते ५ व ३ ते ६ अशी वेळ निर्धारित करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये (रिसिट)मध्ये वेळेची नोंद करण्यात आली होती. महाविद्यालयामार्फत पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  पेपरची वेळ योग्य होती. मात्र थेट विद्यापीठाद्वारे बहि:स्थ विद्यार्थी म्हणून शिक्षण घेणाऱ्या आणि विद्यापीठाच्या दूरस्थ केंद्रामार्फत परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या रिसिटमध्ये १२ ते २ अशी वेळ देण्यात आली आहे. मुळात पेपरच सकाळी ११ वाजता सुरू होत असताना १२ ची वेळ विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने रिसिटमध्ये नोंदविल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला व १ तास वाया गेला.
याबाबत विद्यापीठातील परीक्षा विभागाशी संपर्क साधला असता ही चूक झाल्याचे मान्य करण्यात आले. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात येणार असल्याचेही सांगितले. परीक्षा नियंत्रक श्री. हेर्डेकर यांच्याशी संपर्क साधला असता हा वेळेचा गोंधळ विद्यापीठातील दूरस्थ विभागाचा असल्याचे सांगून वेळ मारून नेली.

Story img Loader