मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला चाप लावला. त्यामुळेच काही जण आपल्यावर फाइल्स अडवून ठेवल्याची टीका करत असतात, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
कराड ते ढेबेवाडी मार्गाच्या चौपदरीकरण कामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, आमदार आनंदराव पाटील, नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची उपस्थिती होती. दरम्यान, कोळे विभागातील जनतेशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधताना, त्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर सकारात्मक भूमिका घेतली.
चव्हाण म्हणाले, की मला जसा महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे तसाच वांग खोऱ्याचाही चेहरा बदलायचा असून, या विभागातील प्रत्येक गावाने पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा आपल्याकडे द्यावा. या रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे एनएच ४ व एनएच १४ हे राष्ट्रीय महामार्ग जोडण्याच्या दृष्टिकोणातून पहिले पाऊल पडले आहे. तसेच ढेबेवाडी खोऱ्यातील जनतेसाठी दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे. कराड-ढेबेवाडी रस्त्यावर वाहतूक मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही मोठी असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे अपघातांच्या संख्या कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ढेबेवाडी फाटा ते महिला उद्योग समूहापर्यंतचा रस्ता यापूर्वीच चौपदरीकरण झाला आहे. तेथून पुढे १५ किलोमीटर मानेगावपर्यंतचे रस्त्याचे चौपदरीकरण या कामातून होणार आहे. यात दोन्ही बाजूला साडेसात मीटर रस्ता, दीड मीटरच्या साइडपट्टय़ा व मध्ये दुभाजक राहणार आहे. रस्त्यावर ३१ बॉक्स मोऱ्या असणार आहेत. मुंबई-दिल्ली कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर राज्य शासनाने मुंबई-बंगळूरू कॉरिडॉरला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ४ ला पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. महामार्गावरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी ढेबेवाडी विभागातून कोकणात संगमेश्वरला बोगदा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचाच एक भाग म्हणून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम महत्त्वाचा टप्पा आहे.
वैयक्तिक कामांना चाप लावल्यानेच फाइल्स अडवल्याची ओरड – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक लोकहिताचे निर्णय घेतल्यानेच रखडलेली विकासकामे मार्गी लागली. परंतु, कोणाच्याही वैयक्तिक लाभाचे निर्णय आपण घेतले नाहीत. उलट त्याला चाप लावला. त्यामुळेच काही जण आपल्यावर फाइल्स अडवून ठेवल्याची टीका करत असतात, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
First published on: 05-08-2014 at 03:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personnel file avoided cm says prithviraj chavan