पेट्रोल व डिझेलवरील कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी देशातील सुमारे ३० हजार पेट्रोल पंपचालकांनी येत्या २४ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंपचालकांना पेट्रोल व डिझेलवर दिल्या जाणाऱ्या कमिशनचा दर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात यावा, अशी शिफारस या संदर्भात नेमण्यात आलेल्या अपूर्वचंद्र समितीने केली आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन गेल्या वर्षभरात कमिशनवाढीबाबत केंद्रीय पेट्रोलियम खात्याने चालढकलीचे धोरण अवलंबले आहे. या काळात पेट्रोलच्या किंमतीमध्ये मात्र सहा वेळा, तर डिझेलच्या किंमतीत तब्बल तेरा वेळा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कन्सोर्शियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डिलर्स या संघटनेने येत्या २४ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली आहे.
संघटनेच्या पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष उदय लोध यांनी या संदर्भात लोकसत्ताला माहिती देताना सांगितले की, सरकारनेच नेमलेल्या अपूर्वचंद्र समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी गेले वर्षभर विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात आला. सध्या पंप चालकांना पेट्रोलवर प्रति लिटर १ रुपया ७९ पैसे व डिझेलवर १ रुपया ९ पैसे कमिशन मिळते. हा दर वर्षांपूर्वीचा असून अपूर्वचंद्र समितीच्या शिफारशीनुसार त्याचा सहा महिन्याने आढावा घेणे अपेक्षित होते. पण वर्ष उलटले तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही. उपलब्ध माहितीनुसार पेट्रोलवर प्रति लिटर २४ पैसे दर डिझेलवर प्रति लिटर ११ पैसे कमिशनवाढ प्रस्तावित आहे. त्याबाबतची फाईल केंद्रीय पेट्रोलियम खात्यामध्ये मंजुरीसाठी अडून राहिली आहे. पेट्रोलचे बाष्पीभवन, आस्थापनेवरील खर्च, राज्य पातळीवर आकारण्यात येणारे विविध कर आणि इतर अनुषंगिक बाबी लक्षात घेता मिळणाऱ्या कमिशनपैकी ९० टक्के भाग या खर्चाच्या भरपाईतच जातो. त्यातून पुन्हा कमिशनवाढीबाबतच्या दप्तर दिरंगाईमुळे हा व्यवसाय आतबटय़ाचा झाला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव येत्या २४ डिसेंबर रोजी देशव्यापी  ‘बंद’ पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्र, केरळ, तमिळनाडू व इशान्येकडील सर्व राज्यामधील मिळून एकूण सुमारे ३० हजार पंपचालक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला देशभर या आंदोलनाचा प्रभाव जाणवणार आहे.