मागील आठवडाभरापासून धाडसत्र सुरु असणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेवर आज केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेला बेकायदेशीर संघटना घोषित करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रामधून प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच भाजपाचे मुंबईमधील आमदार राम कदम यांनी या बंदीचं स्वागत करतानाच काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. राम कदम यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारत असून इथे देशविरोधी, देशद्रोही कारवाया करणाऱ्यांना इंचभरही जागा नसल्याचं आपण या कारवाईतून जगाला दाखवून दिल्याचंही म्हटलं आहे.
‘पीएफआय’ आणि तिच्या संंबंधित संघटनांवर पुढील पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आल्याचं केंद्र सरकारने आज पहाटे जाहीर केलं. ‘पीएफआय’ची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. ‘पीएफआय’चे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांसाठी राम कदम यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये पीएफआयवर टीका केली आहे. “कोणतीही संघटना आणि त्या संघटनेचे कार्यकर्ते या देशात राहून या देशातच खायचं, प्यायचं पण गुणगान मात्र आपल्या शत्रू देशाचे गायचे असं करत असेल तर ते कसं सहन करणार? या देशाच्या भूमीवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे या भारतावर प्रेम करणारा नागरिक कसा काय सहन करेल?” असे प्रश्न विचारले आहे. तसेच पुढे बोलताना कदम यांनी, “इथल्या युवकांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी कारवायांमध्ये भाग घ्यावा म्हणून प्रेरित करायचं काम या संघटनेनं केलं. मात्र हा बदलेला भारत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील या भारतात देशविरोधी, देशद्रोही कारवाई करणाऱ्यांविरोधात कारवाई होणारच,” असं म्हणत पीएफआयवरील बंदीचं स्वागत केलं आहे.
“या भूमीत राहून शत्रू राष्ट्राचं गुणगान सहन करायला आता काय देशात काँग्रेसचं सरकार नाही. त्यांनी सहन केलं असतं. पण हे मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. जी ही संघटनेवर बंदी घातली ती बंदी या गोष्टीचं द्योतक आहे की भारताच्या भूमीत दहशतवाद, दहशतवादी कारवाया आणि त्यात भाग घेणाऱ्या लोकांना इंचभर सुद्धा जागा मिळणार नाही हा संदेश या कारवाईतून आपण संपूर्ण जगाला दिला आहे,” असं कदम यांनी म्हटलं आहे. ट्वीटरवरुनही त्यांनी यासंदर्भातील भाष्य केलं आहे.
पीएफआयबरोबर या संस्थेशी संलग्न असणाऱ्या रिहॅब इंडिया फाउंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन अॅण्ड रिहॅब फाउंडेशन (केरळ) या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.