तीन वर्षांपूर्वी फार्मसीची पदवी पूर्ण केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा शोध सुरु झाला. मात्र अजूनही भटकंती सुरु आहे. नोकरी मिळत नाही. त्यामुळे हताश झालेल्या चांगदेव गित्ते या तरुणाने चक्क डिग्री विकायला काढली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गीतेवाडी हे चांगदेवच गावं. वडील माजी सैनिक आहेत. घरी जेमतेम सात एक्कर शेती. पावसाच्या लहरीपणामुळे ती तोट्यात आहे. तरीही शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च केला. मात्र शिक्षण घेऊन घरचा भार उचलता येत नाही. त्यामुळे हताश झालेल्या चांगदेवने डिग्री विकायला काढली. शिक्षणासाठी झालेल्या खर्चाच्या निम्या किंमतीत सरकारनं डिग्री विकत घ्यावी. किमान कर्जाचा डोंगर तरी कमी होईल असं चांगदेव सांगतो.

स्वत:ची व्यथा मांडताना चांगदेवन शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तो म्हणाला की, आपल्याकडे शिक्षणावर लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्यानंतर शिक्षणाच्या बाजारीकरणात विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. आजच्या घडीला राज्यात हजारो विद्यार्थी फार्मसी, अभियांत्रिकी आणि इतर शिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. एका जागेसाठी हजारो जण अर्ज करत आहेत. कित्येक विद्यार्थी अत्यंत तुटपुंज्या वेतनावर व कमी दर्जाचे काम करत आहेत. तर अनेकांना नोकरी मिळत नाही. मी ही हलकीच्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केलं. पण नोकरी मिळत नाही. जेवढा वेळ आणि पैसा शिक्षणासाठी दिला तेवढा उद्योगासाठी दिला असता, तर हाताला काम असतं. शिक्षण आहे, पण नोकरी नाही. या बाबीचा निषेध म्हणून मी फार्मसीची डिग्री विकायला काढली आहे, असं चांगदेव म्हणाला.

जेवढा खर्च शिक्षणाला झाला त्याच्या अर्ध्याच किंमतीत ही डिग्री सरकारला किंवा अन्य कोणालाही तात्काळ विकणे आहे. सोबतच सरकारला सांगणं आहे, जर राज्यात रोजगार उपलब्ध नसतील तर डिग्री वाटपाची दुकानदारी बंद करावी. कारण यामध्ये फक्त शिक्षण सम्राटाचा फायदा होत आहे. तरुण हे आपला अमूल्य वेळ आणि पैसा शिक्षणासाठी खर्च करतात. परंतु एवढे शिकून ही नोकरी भेटत नसल्याने त्यांची समाजात अवहेलना होते. त्यामुळं तरुणांमधील व्यसनाधीनतेचे आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही तर जीवनयात्रा संपवत आहेत. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.

 

Story img Loader