पोलीस बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवलीय. याच प्रकरणामध्ये आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच फडणवीस यांना गृह विभागाने पाठवलेल्या नोटीशीला विरोध करण्यासाठी भाजपाने उद्या राज्यभरात या नोटीशीची होळी करण्याचा निर्णय घेतलाय. या नोटीशीची उद्या राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील कार्यकर्त्यांकडून होळी केली जाणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
“केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना आठ ते नऊ तास पोलीस ठाण्यात बसवले होते. उद्या फडणवीस यांना किती वेळ पोलीस बसवून ठेवतात हे पाहू. फडणवीस यांचे चाहते भरपूर आहेत. त्यांना पोलीस ठाण्याला घेऊन गेल्यास हजारो कार्यकर्ते तेथे जमा होतील,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
“बदल्यांमध्ये झालेले पैशाचे व्यवहार, अनियमितता याबाबतची माहिती फडणवीस यांनी सभागृहात मांडली. तांत्रिक मुद्दे असलेला पेनड्राईव केंद्रीय गृह विभागाला दिलेला. याबाबतची चौकशी करायची सोडून तुम्हाला हे प्रकरण कसे मिळाले?”, असेही पाटील यांनी म्हटलंय. “राज्य सरकारने फडणवीस यांना चौकशीसाठी बोलावणे म्हणजे विनाश काले विपरीत बुद्धी असा हा प्रकार आहे,” असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.
“मुळात विरोधी पक्ष नेत्याची अशाप्रकारे चौकशी करता येत नाही. सध्या महविकास आघाडीचे नेते पाठोपाठ तुरुंगात जात असल्याने सरकार घाबरले आहे. म्हणूनच विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात घालण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.
फडणवीसांच्या घरीच होणार चौकशी
पोलिसांनी चौैकशीसाठी नोटीस पाठवली असून, उद्या बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आज पत्रकारपरिषद घेत दिली होती. तसेच, निश्चितपणे मी उद्या ११ वाजता बीकेसीमधील सायबर पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र आता फडणवीस उद्या बीकेसी पोलीस स्टेशनला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून याबाबत खुलासा केला आहे.
“सहपोलिस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आत्ता आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. तर, “महाविकास आघाडीचे नवीन षडयंत्र उघडकीस केल्याने आता नोटीस येत आहे. असे असले तरी उद्या, रविवारी, १३ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता, बीकेसी, मुंबई येथील सायबर पोलिस ठाण्यात मी उपस्थित राहीन.” असं या अगोदर फडणवीस यांनी ट्वीटद्वारे सांगितलं होतं.
तसेच, “मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे, बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला उद्या ११ वाजता बोलावलं आहे. मी निश्चितपणे उद्या तिथे जाणार आहे. आता जी काही राज्य सरकारची परिस्थिती आहे आणि विशेषता परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोड मी स्वत: केलाय. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलीस किंवा पोलिसांमधील काही अधिकारी यांना आता त्याचं उत्तर सूचत नसल्याने, अशा प्रकारची नोटीस मला देण्यात आली आहे. मी निश्चितपणे उद्या ११ वाजता बीकेसीच्या सायबर पोलीस स्टेशनला हजर राहील.” अशी माहिती देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारपरिषद घेऊन माध्यमांना दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते आशिष शेलार यांची देखील उपस्थिती होती.
मुंबई पोलिसांकडून फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. “घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धीने असे तुणतुणे वाजवता. मग..घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?लक्षात असू द्या, झुकणार नाही! वाघाच्या जबड्यात घालून हात दात मोजणाऱ्यांची आमची जात!” असं आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.