लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील आगरदांडा ते दिघी दरम्यान रो रो सेवा चालवली जाते. पर्यटकांसह स्थानिक लोक श्रीवर्धनहून मुरुडकडे येण्यासाठी या रो रो सेवेचा वापर करत असतात. ज्यामुळे प्रवास वेळेची मोठी बचत होत असते.

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास एक पिक अप टेम्पो रो रो बोटीत चढवत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने, थेट खाडीच्या पाण्यात पडला. ज्यात चालक गंभीर जखमी झाला. त्याला बेशुध्द अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाणी घेऊन हा टेम्पो बोर्ली पंचायतन येथे निघाला होता. मात्र चालक रिव्हर्स गेअर टाकून गाडी बोटीत चढवत असतांना ही दुर्घटना घडली. ही घटना बोटीवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

आणखी वाचा-माथेरानच्या राणीची आजपासून सफर

बोटीत वाहने चढवण्याचा आणि उतरविण्याचा वेळ वाचावा यासाठी बोट चालकांकडून गाड्या रिव्हर्स गेअरवर बोटीत चढविण्याचा आग्रह धरला जातो. मात्र तरबेज चालक नसेल तर त्याला वाहने बोटीवर उलटी चढवायला कठीण जाते. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. त्यामुळे वाहने रिव्हर्स गेअरवर बोटीत चढवण्याची सक्ती करू नये अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pick up tempo fell in creek while being loaded into boat in raigad mrj