जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी जयंत पाटील यांचे शेतकरी पॅनेल व कदम-दादा गटाचे रयत पॅनेल यांच्यात लढत होत असली तरी साऱ्या जिल्ह्याचे राजकारण अवघ्या २२०७ मतदारांभोवती फिरत आहे. ठराविक मतदार असल्याने सहलीचे नियोजन करण्यात आले असून मतदार सभासद नॉट रिचेबल ठेवण्यात सारी राजकीय यंत्रणा गुंतली आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा फड एकीकडे रंगत असताना खरा मतदार असणारा सोसायटी प्रतिनिधी मात्र गेल्या दोन दिवसांपासून गायब झाला आहे. दूरच्या सहलीवर गेला असल्याचे त्याचे नातलग सांगत आहेत. सभासद मतदारासाठी हा सुगीचा काळ असून या बदल्यात राजकीय सोय आणि एखादे लाभाचे पद तर आहेच पण त्याचबरोबर अडी-नडीला थोडी बहुत वरकमाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्हा बँकेच्या निमित्ताने प्रचाराचा औपचारिक शुभारंभ शेतकरी पॅनेलचे नेते जयंत पाटील इस्लामपूरपासून करणार आहेत. त्यांचा आजपासून चार दिवसांचा प्रचार दौरा निश्चित करण्यात आला असून आज इस्लामपुरात प्रारंभ करण्यात आला. मात्र सोसायटी गटातून या ठिकाणी दिलीप तात्या पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. कडेगाव, पलूस, विटा, आटपाडी, तासगाव या ठिकाणच्या प्रचारानंतर जत येथे या प्रचाराची सांगता होणार आहे. ५ मे रोजी मतदान होणार असून जिल्ह्यातील १२ ठिकाणी मतदान केंद्रे आहेत.
या प्रचार दौऱ्यात जयंत पाटील यांच्यासोबत मदन पाटील, खा. संजयकाका पाटील, विलासराव जगताप, आ. अनिल बाबर आदी सहभागी होणार आहेत. मात्र पूर्णपणे भाजपाचे आमदार असणारे सुधीर गाडगीळ आणि सुरेश खाडे यांना या प्रचारात फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. त्यांच्याकडे सहकारी संस्था नसल्याने त्यांना फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही.
काँग्रेसचे नेते मदन पाटील यांना जयंत पाटील यांच्या पॅनेलमध्ये आणण्यात भाजपा आ. विलासराव जगताप यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने जगताप यांचे चिरंजीव मनोज जगताप यांना या निवडणुकीत घेरण्याचे कदम आणि दादा गटाचे प्रयोजन आहे. त्यासाठी जतच्या विक्रमसिंह सावंत यांनी जोरदार ताकद लावली आहे.